परभणी : पाथरी येथील माळीवाडा परिसरात घरफोडी करून आरोपीने सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ६ लाख ७३ हजार रुपये) हस्तगत केले आहेत.
पाथरी येथील माळीवाडा परिसरात गुरुवारी (दि. १२) चोरट्यांनी एका घरात घुसून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख एक लाख रुपये चोरून नेले होते. यावरून पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते.
यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हा गुन्हा आरोपी किशोर तेजराव वायाळ (वय ४५, रा. मेरा, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने त्याच्या साथीदारांसोबत केल्याचे उघड झाले. यावरून त्याला पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिली.
दरम्यान, घरफोडीतील ७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीकडून यावेळी हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यातील चोरलेली रक्कम व सोने विकून मिळालेली रक्कम आरोपीने स्वतःच्या बँक खात्यावर जमा केल्याचे दिसून आले आहे. यावरून आरोपीचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया अवलंबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रिव केंद्रे, नीलेश भुजबळ, व्ही.एन. सातपुते, तुपसुंदर, हनवते, हुसेन रफियोद्दीन आदींसह सायबर पोलीस ठाण्याचे गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली.