पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ राजकारणात सक्रिय झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. निवडणुकीतील आव्हाने आणि संधी यासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची पार्थ यांनी जिजाई निवासस्थांनी आढावा बैठक घेतली. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व सेल अध्यक्ष, युवक कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुकीतील आव्हानासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहर कार्यकारिणीने एकदिलाने आणि एकजुटीने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच येत्या काळात कार्यकारिणीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगतानाच युवक मेळावे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>उत्तर महाराष्ट्रात रविवारी गारपिटीचा इशारा, आजपासून पावसाचा जोर वाढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पार्थ यांनी २०१९मधील लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढविली होती. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर पार्थ सक्रिय राजकारणात फारसे दिसले नव्हते. राज्यातील बदलल्या सत्ता समीकरणानंतर पार्थ मावळ किंवा बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढतील, अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर पार्थ यांना संधी मिळेल, असेही बोलले जात होते. सहकाराच्या माध्यमातूनच पार्थ यांना राजकारणात आणण्यासाठीच पवार यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा होती. तत्पूर्वी राज्यातील सत्तेमध्ये अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह सहभागी झाल्यानंतर पार्थ राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली होती. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनालाही पार्थ उपस्थित होते. स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित रहात जनसंपर्क वाढविण्यास त्यांनी सुरुवात केल्याने ते राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत होते. त्यातच त्यांनी थेट बैठक घेतल्याने ते राजकारणात सक्रिय झाल्यावर शिक्कामोतर्ब झाले आहे.