लोकप्रतिनिधींच्या भूमिकेचा विरोध; अकरा किलोमीटर प्रवासाला मोठा टोल

अमरावती : मोर्शी-वरूड किंवा त्याआधी नांदगावपेठला जायचे असले तरी केवळ अकरा किलोमीटरच्या प्रवासासाठी पन्नास किलोमीटपर्यंतचा टोल द्यावा लागतो. या विरोधात अनेकांनी आवाज उठवला तरीही अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नांदगावपेठ येथील टोल नाक्यावर प्रवाशांच्या नाकावर टिच्चून वसुली सुरूच आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल विचारत टोलला कंटाळलेले लोक आता पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहेत.

नांदगावपेठ येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारितील टोल नाका आहे. आयडियल रोड बिल्डर्सने हा रस्ता तयार केला आहे. त्याबदल्यात टोल आकारला जातो. मोर्शी-वरूडला जाण्यासाठी नांदगावपेठहून दुसरा मार्ग आहे, पण अमरावती ते नांदगावपेठ या अकरा किलोमीटर प्रवासासाठी संपूर्ण टोल नांदगावपेठ येथे भरावा लागतो. हा टोल नाका नागपूर मार्गावर नांदगावपेठहून थोडय़ा दूर अंतरावर न्यावा, अशी लोकांची रास्त मागणी होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

नांदगावपेठ येथील टोल नाका हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ९ ऑक्टोबर २०१४ रोजी एका प्रचार सभेत केला होता. त्यांनी केलेले पाप कशा प्रकारे दूर होऊ शकते, यासाठी आपण आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या पाठपुराव्यानेतच सन्मानजनक तोडगा काढू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते, पण या आश्वासनाची पूर्ती अद्याप झालेली नाही. मोर्शी येथून अमरावतीत दररोज आवागमन करणारे भाजी विक्रेते, शेतकरी यांनाही टोलचा भुर्दंड  बसतो. अमरावती-मोर्शी मार्गाचे चौपदरीकरणही एनएचएआयने केले नाही किंवा या मार्गावर कोणता पूलदेखील बांधलेला नाही; परंतु मोर्शी वळणमार्गाच्या अगोदरच नांदगावपेठचा टोल नाका असल्याने मोर्शीहून अमरावतीला ये-जा करणाऱ्यांनाही टोल भरावा लागतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्शी-अमरावती मार्गावरून ये-जा करणाऱ्या स्थानिकांना पासेस देण्याचा तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर ते अमरावती या महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान तळेगाव ते बडनेरा अशा ६७ किलोमीटरच्या रस्ता बांधकामासाठी पुढील वीस वर्षांसाठी हा टोल नाका लावण्यात आला. अमरावती ते नागपूर रस्त्याकरिता नांदगावपेठनजीक उभारलेल्या टोल नाक्याचा आर्थिक भुर्दंड मोर्शी, वरूड, शेंदूरजनाघाट आणि पुढे मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या वाहनधारकांना सोसावा लागतो. मोर्शीला जाणारे वाहन फक्त ११ किलोमीटर एवढय़ा लांबीच्या रस्त्याचाच वापर करतात. त्यामुळे एवढय़ाशा अंतराकरिता टोल द्यायला ग्रामीण भागातील प्रवाशांचा विरोध आहे.

टोलनाक्याला विरोध करण्यासाठी वर्षभरपूर्वी मोर्शीकडे जाण्यासाठी टोलनाक्याच्या आधीपासून एक पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. किसान एकता मंच अणि अमरावती ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या कामी पुढाकार घेतला होता. टोल वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरून वाहतूकदेखील सुरू झाली होती. टोल नाकारण्याच्या या अभिनव आंदोलनाचे रूपांतर पर्यायी रस्त्यात झाले. मनसेसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलनेही केली

होती.  टोल नाक्यापासून वीस किलोमीटर अंतरावरील गावांतील काही वाहनधारकांना कंपनीने टोलमध्ये सवलत दिली आहे. त्यानुसार वीस किलोमीटरच्या परिघातील गावकऱ्यांसाठी मासिक रक्कम आकारली जाते. नांदगावपेठ आणि रहाटगाव येथील गिट्टी बोल्डर अणि बांधकामाचे साहित्य ने-आण करणाऱ्या टोल आकारणी शुल्क सवलत दिली जाते, पण  शुल्क सवलत किंवा पासेसच्या माध्यमातून लोकांना गप्प केले जाते. असे  कृती समितीचे म्हणणे आहे.

या मार्गावरून जाणारी वाहने केवळ दहा किलोमीटरपुरता या रस्त्याचा वापर करीत असताना त्यांच्याकडून पूर्ण ५० किलोमीटर मार्गाचा टोल वसूल केला जातो. ही सरसकट लुबाडणूकच आहे. कुणीही जनप्रतिनिधी याविरुद्ध आवाज उठवत नाही. सर्वाचे असे टोलच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. यामुळे आता जनतेनेच लढा दिला पाहिजे. सामान्यांची शक्ती लवकरच सरकारला दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– प्रदीप बाजड,  टोलविरोधी कृती समिती, अमरावती