पिंपरी : गाडीची सर्व्हिसिंग व्यवस्थित न केल्याने एक व्यक्तीने ३९ लाखाच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीत चक्क कचरा भरून कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला परत दिली आहे. लाखो रुपयांची गाडी आता कचरा भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला देणार असल्याचं गाडीमालक हेमराज चौधरी यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये आता लाखो रुपयांची फॉर्च्युनर गाडी कचरा गोळा करणार आहे. यामुळे शहरात या गाडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

सविस्तर माहिती अशी की, गाडी मालक हेमराज चौधरी रा. निगडी हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांनी मार्च महिन्यात ३९ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर ही नवी कोरी गाडी भोसरी येथून विकत घेतली. गाडीच्या नंबरसाठी लाखो रुपये खर्च करून एम.एच-१४ जी.सी ५ हा नंबरही घेतला. मात्र, काही दिवसानंतरच गाडीत बिघाड झाला. दुरुस्त करण्यासाठी भोसरी येथील कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी पाठवण्यात आली, परंतु गाडी व्यवस्थित दुरुस्त केली गेली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस देखील असाच काहीसा अनुभव गाडीमालक हेमराज यांना आला.

त्यामुळे चिडलेल्या हेमराज यांनी लाखो रुपयांच्या गाडीत चक्क कचरा भरून सर्व्हिस सेंटरला पाठवली. विशेष म्हणजे काही तासांनी ही गाडी थेट एम.आय.डी.सी पोलिसात गेली, याविषयी गाडीमालकाला काहीच कल्पना नाही. आता आपण ही फॉर्च्युनर गाडी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला कचरा गोळा करायला देणार असल्याचे हेमराज यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा विभागाला अच्छे दिन आले आहेत असंच म्हणावं लागेल.