Navi Mumbai International Airport Name: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बुधवारी (८ ऑक्टोबर) लोकार्पण केले. मात्र अद्याप या विमानतळाला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास गौतम अदाणी यांचा विरोध असल्याचा दावा आता शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे.
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळावे, यासाठी गेली तीन वर्षे पनवेल आणि उरण परिसरातील स्थानिक आंदोलन करत आहेत. लोकार्पण होण्यापूर्वी राज्य सरकारने दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे बोलले गेले. मात्र लोकार्पणाच्या कार्यक्रमात दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी बुधवारी उघड्या बोडक्या विमानतळाचे लोकार्पण केले. दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यास भाजपाचा विरोध आहे. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची गरज नाही, असा विचारप्रवाह भाजपात आहे. गौतम अदाणी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा विचार
‘नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी, प्रस्ताव आणि चर्चा भाजपाअंतर्गत सुरू असल्याची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
“अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे होते. त्याचे नामांतर जिवंतपणीच नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबईच्या विमानतळालाही नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात यावे, यासाठी भाजपा पक्षात एकमत झालेले आहे. यास गौतम अदाणी यांचाही होकार असल्यामुळे नवी मुंबईच्या विमानतळास दिबा पाटील यांचे नाव मिळू शकले नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला.
नवी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदाणींच्या नावाने ओळखला जावा किंवा त्याला नरेंद्र मोदी यांचे नाव मिळावे, अशी मागणी उद्योगपती गौतम अदाणींची आहे, असाही दावा संजय राऊत यांनी केला. दिबा पाटील यांच्या नावाने सदर विमानतळाचा प्रकल्प मंजूर झालेला होता. त्यामुळे विमानतळाला त्यांचेच नाव दिले जावे, अशी शिवसेनेची (ठाकरे) मागणी पुढेही असणार असेही राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी विष्णूचे अवतार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार असून त्यांचे नाव विमानतळाला देण्याची काही गरज नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमला सुरुवातीला नरेंद्र मोदी असे नाव देण्यास पंतप्रधान मोदींनी विरोध दर्शविला होता. तरीही स्वतःच्या नावाच्या स्टेडियमचे उद्घाटन त्यांनी केलेच होते. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत त्यांनी केलेल्या विधानांवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.