बीडमध्ये दिशा संगणक केंद्रावर मंगळवारी (१ फेब्रुवारी) म्हाडाची ऑनलाईन परीक्षा पार पडली. ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रावरील अधिकारी प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासत असताना एक डमी विद्यार्थी उघडकीस आला. त्याला परीक्षा केंद्र परिसरात बंदोबस्तावर असलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पाठलाग करून पकडले. या प्रकरणी अर्जुन बाबुलाल बिघोत (रा. जवखेडा, ता. कन्नड, जि.औरंगाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अर्जुन बिघोत हा राहुल किसन सानप (रा.वडझरी, ता.पाटोदा) या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र दाखवून परीक्षा देणार होता. मात्र, त्यापूर्वीच अधिकार्‍यांच्या सर्तकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेशपत्र व ओळखपत्र टी. सी. एस कंपनीचे प्रतिनिधी विजयकुमार काशीनाथ बिराजदार हे तपासणी करत होते. परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास बिराजदार यांनी समोर आलेल्या एका विद्यार्थ्याला त्याचे हॉलतिकीट व एक ओळखपत्र मागितले. तेव्हा त्याने हॉलतिकीट व त्यासोबत ओळखपत्र म्हणून वाहन परवाना दाखवला. त्याला बिराजदार यांनी त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने राहुल किसन सानप (रा.वडझरी, ता.पाटोदा) असे सांगितले.

“ओळखपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्तीचा चेहरा वेगळा”

विद्यार्थ्याच्या नावाची खात्री केली गेली, तेव्हा ते नाव व पत्ता बरोबर निघाला. मात्र संबंधित विद्यार्थ्याने सादर केलेल्या ओळखपत्रावरील फोटो व त्या व्यक्तीचा चेहरा वेगळा दिसून आला. दरम्यान आपण पकडले जावू या भितीपोटी त्याने आधारकार्ड आणून देतो असे सांगत बिराजदार यांना दिलेले प्रवेशपत्र व वाहन परवाना त्यांच्या हातातून हिसकावून घेत पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस अंमलदार संगीता सिरसट व पोलिस अंमलदार राठोड यांनी त्यास पाठलाग करुन ताब्यात घेत शिवाजीनगर ठाण्यात नेले.

हेही वाचा : डोंबिवलीत मोठं रॅकेड उघड, बँकेला २४ कोटींना फसविण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून ७ जणांना अटक

आरोपीची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक मोबाईल, तसेच एक काळ्या रंगाचे डिव्हाईस, एक एअरफोन व त्याचे दोन छोटे सेल असे साहित्य आढळून आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव अर्जुन बाबुलाल बिघोत (रा.जवखेडा, जि.औरंगाबाद) असे सांगितले. या प्रकरणी म्हाडाचे कनिष्ठ अभियंता अमितेश राजेंद्रसिंह चव्हाण (रा.औरंगाबाद) यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरुन आरोपी अर्जुन बाबुलाल बिघोत व राहुल किसन सानप या दोघांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक शैलेश शेजूळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest dummy student in mhada exam in beed pbs
First published on: 01-02-2022 at 22:40 IST