परभणी : पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिकविमा मिळू नये यासाठी ‘ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाने’ सदोष वजनी काटे वापरून ग्रामस्तरीय विमा समितीची फसवणूक केल्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसात मंगळवारी (दि. १४) या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पालम तहसील कार्यालयात रात्रभर ठिय्या आंदोलन केले.

पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी अनिकेत शेरे (वय ३१) आणि रत्नदीप भालेराव (वय ३४), खराब धानोरा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अच्युत भालेराव आणि ग्रामस्तरीय विमा समितीचे सदस्य भास्कर कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत गट क्रमांक ४४/२ शिवारात ग्रामस्तरीय विमा समितीने खरीप हंगामातील सोयाबीन पीक कापणी प्रयोग केला.

प्रयोगानंतर सोयाबीन धान्याचे ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत शेरे, रत्नदीप भालेराव यांनी वजन केले असता ते ५ किलोग्रॅम एवढे भरले. या वजनावर ग्रामस्तरीय विमा समितीचे सदस्य भास्कर बालासाहेब कऱ्हाळे यांनी आक्षेप घेतल्याने ग्रामविकास अधिकारी अच्युत भालेराव यांनी गावातील किराणा दुकानातील वजन काटा आणून पीक कापणीअंती उपलब्ध झालेल्या सोयाबीनचे वजन केले असता ते ३ किलोग्रॅम इतके भरले. त्यामुळे संबंधित विमा कंपनीने प्रतिनिधींकडे दिलेला वजनी काटा आणि गावातील किराणा दुकानातील वजनी काटा यांच्या वजनात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी संबंधित विमा कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भास्कर यांनी तालुकास्तरीय विमा समितीकडे केली.

यावरून तालुकास्तरीय विमा समितीचे अध्यक्ष तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, गटविकास अधिकारी उदयसिंह सिसोदे आणि समितीचे सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी शहानिशा केली असता वजनात वाढ झाल्याचे दिसून आल्याने वजनी मापे निरीक्षक संजय धुमाळ यांनी काट्यांची तांत्रिक तपासणी केली. या तपासणीत तब्बल १ किलो ९७७ ग्रॅम एवढी तफावत आढळून आली. तसा अहवाल वजनी मापे निरीक्षक संजय धुमाळ यांनी तालुकास्तरीय विमा समितीस सादर केला.

यावरून ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने सदोष वजनी मापाच्या आधारे ग्रामस्तरीय विमा समितीची दिशाभूल केली. शेतकऱ्यांना पिकविमा मिळू नये यासाठी बेकायदेशीर प्रयत्न केला आणि सदोष वजनी मापांच्या आधारे सोयाबीन कापणी प्रयोगातील वजनात वाढ घडवून आणल्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये रात्रभर ठिय्या

सरासरी उत्पन्न ठरवण्याच्या पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया सुरू असताना वजनमापात खोट केल्याचे उघड झाले. कंपनीच्या प्रतिनिधींना घेऊन शेतकऱ्यांनी पालम पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. नंतर शेतकऱ्यांनी त्यांचा मुक्काम तहसील कार्यालयात हलवला. रात्रभर शेतकरी तहसीलमध्येच होते. पीक विमा प्रश्नावर संघर्ष करणारे सुभाष कदम, गोविंद लांडगे, भगवानराव करंजे, मोतीराम शिंदे, दिनाजीराव कराळे आदीसह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.