अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अलिबागचे तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत अडचणीत सापडले आहेत. वन्यजीवाची शिकार आणि मांस बाळगल्या प्रकरणी पोलीसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. या कारवाईत संरक्षित वन्यजीवामध्ये मोडणाऱ्या भेकराचे एक किलो मास अलिबाग पोलीसांनी भगत यांच्या घरातून जप्त केले आहे. पोलीसांनी पंचनामाकरून हे मांस आणि भगत यांना वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. तर वनविभागाने त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र या शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

फणसाड अभयारण्यात भेकराची शिकार करून त्याचे मास जयेंद्र भगत यांनी घरात बाळगले असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सहा पोलीस निरीक्षक एस एन मुसळे यांच्या पथकाने पंचासमवेत गुरुवारी रात्री भगत यांच्या घरी छापा टाकला. घरझडती दरम्यान भगत यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिज मध्ये सुमारे एक किलो वजनाचे भेकराचे मांस आढळून आले. पोलीसांनी पंचनामा करून हे मांस ताब्यात घेतले. त्यानंतर अलिबागच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बोलावून जप्त केलेले मास पुढील कारवाईसाठी ताब्यात दिले.

भेकराची शिकार प्रकरणात आणखिन कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस आणि वनविभागा मार्फत सुरू करण्यात आला आहे. तर जयेंद्र भगत यांनाही पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीसांच्या या कारवाईमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठीच खळबळ उडाली आहे. भेकर हे संरक्षित वन्यजीव प्रजाती मध्ये समाविष्ट आहे. आणि या भेकराची शिकार ही संरक्षित फणसाड अभयारण्यात झाल्याची प्राथमिक माहिती असल्याने, या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

जयेंद्र भगत हे अलिबाग तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. चार दिवसांपूर्वीच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जयेंद्र भगत यांच्या वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये वनविभागाच्या माझे वन या विशेष उपक्रमाची सुरुवात केली होती. यानंतर चारच दिवसांनी भगत यांच्या घरी शिकार केलेल्या भेकराचे मास आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान भगत यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान वन्यजीवांची शिकार करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यामुळे त्यांची शिकार करू नये तसेच त्यांचे मास बाळगू नये असे प्रकार होत असल्यास, तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा वनविभागास त्याची माहिती द्यावी असे आवाहन रायगड पोलीसांनी केले आहे.

वनविभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी आम्ही सुरू केली आहे. चौकशीनंतर या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल. नरेंद्र पाटील अलिबाग वन परिक्षेत्र अधिकारी