scorecardresearch

VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…

दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती.

VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…

दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला होता. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

या सर्व घडामोडीनंतर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात पोलीस कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. नवनीत राणा यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी एका पोलिसाच्या पत्नीने केली आहे. दोन दिवसांत नवनीत राणांनी माफी मागितली नाही तर, आपण आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा पोलिसाच्या आंदोलक पत्नीने दिला आहे. पोलिसांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुंबई किंवा दिल्लीला जाऊन आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

हेही वाचा- “लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का?”

नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत पोलिसाची आंदोलक पत्नी म्हणाल्या की, “नवनीत राणा आता तू माफी माग, मला मुंबईला जावं लागलं तरी जाणार, मला दिल्लीला जावं लागलं तरी जाणार, पण हे प्रकरण आता थांबणार नाही. जोपर्यंत तू माफी मागणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी इथे बसून आमरण उपोषण करेन. तुला माफी मागावीच लागणार आहे. तू दहावी-बारावी पास झाली आहेस, इथे जे अधिकारी येतात…, ते यूपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अहोरात्र जागरण करत मेहनत करतात. तूदेखील करोना काळात एका पोलीस अधिकाऱ्याचा ऑडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला होता. सर्वांना नियम सारखे असायला पाहिजेत, तिला कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवालही पोलिसाच्या कुटुंबियांनी विचारला आहे.

“नवनीत राणा तुझा निषेध असो, पोलिसांची हाय तुला सुखाने जगू देणार नाही. तू त्यांची बदनामी केली आहे, मी आता गप्प बसणार नाही, तू काहीही बोलली तरी मला आता फरक पडणार नाही. पण तुझ्याविरोधात आता मी अविरतपणे लढणार आहे. तू फक्त नौटंकी आहेस, नौटंकीच राहशील आणि नौटंकीच करशील” अशी प्रतिक्रियाही पोलिसाच्या पत्नीने दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या