हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठे शहर असलेल्या इचलकरंजीमध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयावरून सत्तारुढ काँग्रेस आणि विरोधी शहर विकास आघाडी यांच्यात राजकारण रंगले आहे. विशेष म्हणजे शेट्टी यांना कार्यालय देण्यासाठी सत्तारुढ-विरोधकात एकमत असले तरी ते नेमक्या कोणत्या पध्दतीने द्यावे यावरून शाब्दिक जुगलबंदी सुरु झाली आहे.
जनसंपर्क कार्यालयासाठी पालिकेच्या जुन्या इमारतीतील गाळे मिळावेत. त्यासाठी नियमानुसार भाडे भरण्याची तयारी आहे, अशा आशयाचे खासदार राजू शेट्टी यांचे पत्र शुक्रवारी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष जयवंत लायकर व पक्षप्रतोद अजित जाधव यांनी उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले यांना दिले. तर सत्तेत असताना शेट्टी यांचे कार्यालय मागणीचे पत्र केराच्या टोपलीत टाकणाऱ्या विरोधकांकडून राजकारण केले जात असून गाळे देण्यास कसलाही विरोध नसल्याची माहिती, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी दिली.
खासदार शेट्टी यांना जनसंपर्क कार्यालयासाठी जागा देण्याचा विषय गेली सहा-सात वष्रे गाजत आहे. शुक्रवारी शेट्टी यांच्या नावाचे याच आशयाचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर त्यावरूनही वाद-विवादाला तोंड फुटले आहे. सदर पत्राचा उल्लेख करून अजितमामा जाधव म्हणाले, शेट्टी यांनी मेघा चाळके या नगराध्यक्षा असताना कार्यालयासाठी जागा मागितली होती. मात्र चाळके यांचा कालावधी संपल्यामुळे तेव्हा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यानंतर शेट्टी यांचे बंधू डॉ. सुभाष शेट्टी हे नगरपालिकेकडे या संदर्भात संपर्क साधून होते. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी विजय संपादन केल्यानंतर जनसंपर्क कार्यालयाची गरज भासू लागली आहे. त्यासाठी जुन्या नगरपालिकेतील आरोग्य खात्याचे कार्यालय व पूर्वीचे विद्युत कार्यालय ही जागा रितसर अनामत रक्कम व नियमानुसार होणारे भाडे भरून मिळावे अशी मागणी शेट्टी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
जाधव यांनी मांडलेल्या भूमिकेचे खंडण करताना मोरे म्हणाले, जनसंपर्क कार्यालयासाठी रितसर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. एडीटीपी विभागाकडून भाडे मंजुरी मिळाल्यानंतर गाळा ताब्यात दिला जाईल. यापूर्वी गाळे भाडय़ाने देण्याचा नगरपालिकेच्या सभेत ठराव झाला असताना त्याला ३०८ कलमान्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थगिती मागण्याचे काम विरोधकांनी केले आहे. एकूणच गाळे भाडय़ाने देण्याच्या बाबतीत विरोधक विसंगत भूमिका घेत असून त्यांच्या दुटप्पी वर्तनाने जनतेची दिशाभूल होत आहे. शशांक बावचकर म्हणाले, शेट्टी-हाळवणकर यांचे राजकीय साटेलोटे झाल्यामुळे आता आघाडीला जाग आली आहे. यावेळी नगराध्यक्षा बिस्मिला मुजावर, गटनेते बाळासाहेब कलागते, प्रा. शेखर शहा आदी उपस्थित होते.
पक्ष कार्यालयाचे काय?
वाद-विवाद रंगत असला तरी खासदार राजू शेट्टी यांना जुन्या नगरपालिकेत जनसंपर्क कार्यालयासाठी गाळा मिळण्यात अडचण येणार नाही. मात्र शेट्टी ज्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे व संघटनेचे नेतृत्व करतात त्या पक्षासाठी इचलकरंजीत गेल्या पाच वर्षांपासून कार्यालय काढलेले नाही. आतातरी अशा प्रकारचे कार्यालय सुरू करण्यासाठी शेट्टी पुढाकार घेणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. जनसंपर्क कार्यालयात पक्ष कार्यालय थाटले जाणार, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2014 रोजी प्रकाशित
राजू शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयावरून राजकारण
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठे शहर असलेल्या इचलकरंजीमध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयावरून सत्तारुढ काँग्रेस आणि विरोधी शहर विकास आघाडी यांच्यात राजकारण रंगले आहे.
First published on: 01-06-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics on raju shetty public relation office