scorecardresearch

सोलापूर : प्रदूषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी दोन लाखांची लाच घेताना सापडला जाळ्यात

संबंधित लाचखोर अधिकाऱ्याविरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. कार्यालयातही ते सहजासहजी भेटत नव्हते.

सोलापूर : प्रदूषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी दोन लाखांची लाच घेताना सापडला जाळ्यात
प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिकाऱ्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अजित वसंतराव पाटील (वय ५०) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका साखर कारखान्यात आसावनी प्रकल्प चालविण्याचा परवाना नुतनीकरण आणि प्रस्तावित औषधनिर्माण (फार्मास्युटिकल) विभाग स्थापन करण्यास परवाना मिळवून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यासाठी अधिकाऱ्याने २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- Maharashtra Karnataka border dispute : “ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार ते काय नाही देणार, त्यांच्या….” कर्नाटकच्या ठरावावर अजित पवारांचं विधान!

सोलापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याला त्यांच्याकडील आसावनी प्रकल्प चालविण्याच्या परवान्याचे नुतनीकरण करायचे होते. तसेच प्रस्तावित औषधनिर्माण विभागाच्या उभारणीसाठी परवाना हवा होता. ही कामे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित आहेत. यासंदर्भात संबंधित कारखानदाराने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. कामाच्या अनुषंगाने कागदपत्रे दाखल केली होती. परंतु संबंधित साखर कारखान्याकडून वायू आणि जलप्रदूषण होत असल्याबाबत तक्रारी होत्या. त्यावर कारवाईची भीती दाखवून अधिकारी पाटील यांनी सुरूवातीला संबंधित साखर कारखानदाराला अडचणीत आणले. नंतर याप्रकरणी कोणतीही कारवाई न करण्यासाठी तसेच आसावनी प्रकल्प आणि औषधनिर्माण विभागाशी संबंधित प्रस्ताव शिफारशींसह वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी पाटील यांनी दोन लाख रूपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास कामे होणार नाहीत, उलट प्राप्त तक्रारींनुसार कारवाई करण्यात येईल, असे धमकावले. तेव्हा वैतागलेल्या संबंधित साखर किरखानदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पडताळणी होऊन कारवाईचा सापळा लावण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व चंद्रकांत कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात”, तीन नेत्यांचा उल्लेख करत संजय राऊतांचा गंभीर आरोप

प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील यांच्या विरोधात संबंधित नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. कार्यालयात ते सहजासहजी भेटत नसत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही पाटील यांच्या विरोधात पुणे विमगीय आयुक्तांकडे कारवाईचा अहवाल पाठविला होता. दरम्यान, पाटील हे अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 19:33 IST

संबंधित बातम्या