वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, वंचितने निवडणुकीच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात पक्षाची मोर्चेबांधणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर युती केली आहे. अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाविकास आघाडीतही (ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग आहे) जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात अराजकता वाढेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी याअगोदरही म्हटलं आहे की इथे दिवाळीनंतर कत्तल की रात (कत्तलींची रात्र) होईल. सगळीकडे पूर्णपणे अराजकता माजलेली असेल. या देशात निवडणुकीच्या अगोदर जी परिस्थिती याआधी कधीच झाली नाही, तशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व भारतीयांना माझा आग्रह आहे की, कितीही स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी मतदान होईपर्यंत सर्वांनी शांतता राखा. मी आधीच सर्वांना शांततेचं आवाहन करतोय. राज्यात आरक्षणाची मागणी करणारी आंदोलनं स्फोटक होत आहेत. त्यामुळे ‘कब है दिवाली?’ असं म्हणायची वेळ आली आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे की, वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असून पक्षाने तशी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

हे ही वाचा >> अजित पवार गणपती दर्शनासाठी फडणवीसांच्या घरी गेले पण मुख्यमंत्र्यांकडे का गेले नाहीत? दीपक केसरकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होणार का?

वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्हावा यासाठी प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत पत्र देऊनही त्यावर अद्याप उत्तर आलेलं नाही. लोकसभा निवडणुका कधीही होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार असल्याची घोषणा वचितचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.