महाराष्ट्रात गेले १० दिवस गणेशोत्सव मोठ्या ज्ल्लोषात साजरा करण्यात आला. १० दिवस गणरायाची सेवा करून गणेशभक्तांनी गुरुवारी (२८ सप्टेंबर) आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वर्षा बंगल्यावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या १० दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी, गणपतीच्या आरतीसाठी बरेच मान्यवर येऊन गेले. अनेक राजकीय नेते, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मुख्यमंत्र्यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व आमदारांना त्यासाठी आमंत्रणही दिलं होतं. त्याप्रमाणे शिवसेनेच्या शिंदे गटातील बहुतांश आमदार, बहुतांश भाजपा आमदार एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले होते. परतु, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले नाहीत. यावर वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणी शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर म्हणाले, या खूप छोट्या गोष्टी असतात. नेमकं अजित पवार त्यावेळी मुंबईत नसतील, पुण्यात असतील किंवा काही वेगळ्या गोष्टी असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. कदाचित चुकून राहून गेलं असेल. केसरकर हे एबीपी माझाशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांसाठी वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु, तो कार्यक्रम मंत्र्यांसाठी नव्हता. यावर पत्रकाराने केसरकर यांना विचारलं की, या कार्यक्रमालाही राष्ट्रवादीचे फारसे नेते, मंत्री दिसले नाहीत, त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, नेहमी एवढ्या लांबून गणपती पाहायला येणार का? माझ्यासारखा एखादा मनुष्य रात्रभर गणपती पाहतो. मला शक्य झालं त्या बहुतांश गणेश मंडळांना मी भेटी दिल्या. परंतु, मुंईतल्या अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मला भेटी देता आल्या नाहीत.
मुंबईत महिलेला घर नाकारलं, शिंदे गटातील मंत्री म्हणाले, “बहुतांश मराठी लोक…”
केसरकर म्हणाले, गणेशोत्सव ही आपली संस्कृती आहे. त्यात हे असं काही नसतं. वरचेवर खाजवून खरूज काढली जाते तसा हा प्रकार असतो. आपलं सरकार चांगलं चाललंय. आम्ही चांगले निर्णय घेत आहोत. कोण कोणाकडे गेलं आणि कोण कोणाकडे गेलं नाही, यातून काही वेगळे अर्थ काढणं अत्यंत चुकीचं आहे.