महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांची सत्रं चालू आहेत. पंरतु, मविआने अद्याप त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही, तसेच त्यांनी एकही उमेदवार जाहीर केला नाही. दरम्यान, सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेच्या मविआच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रणिती शिंदे या यंदा सोलापूरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. या चर्चेवर प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल.

महाविकास आघाडीत सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार आहे. सोलापूर लोकसभा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा या मतदारसंघात भाजपाने पराभव केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या शरद बनसोडे यांनी १.४९ लाख मतांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांनी १.५८ लाख मतांनी शिंदे यांचा पराभव केला होता. यंदा काँग्रेस सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असू शकतात.

दरम्यान, भाजपाच्या उमेदवारीबाबत प्रणिती शिंदे म्हणाल्या, आमचा उमेदवार ठरला आहे. परंतु, त्यांचं कधी ठरणार ते माहिती नाही. देशात लोकशाही आहे. त्यामुळे इथे कोणी कोणाला घाबरू नये. आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत कारण आमचं आता ठरलंय. त्यांचं कधी ठरणार ते माहिती नाही. तरीदेखील निवडणूक ही निवडणूक असते. कोणीही गाफिल राहू नये. शेवटी विजय लोकांचा होणार आहे.

हे ही वाचा >> महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर वंचितचा संताप; म्हणाले, “तुमच्यासारखे लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने महाराष्ट्रातील लोकसभेच्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत सोलापूरचा समावेश केलेला नाही. भाजपाचे जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत. परंतु, भाजपा यंदा स्वामी यांचं तिकीट कापून भाजपा नेते राम सातपुते यांना उमेदवारी देऊ शकते. मतदारसंघात सध्या सातपुतेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपा नेते शरद बनसोडेदेखील उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. २०१९ ला भाजपाने बनसोडे यांचं तिकीट कापून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तिकीट दिलं होतं.