चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदार संघाची निवडणूक खऱ्या अर्थाने चर्चेची ठरली होती. राज्यातील विधानसभा निवडणूका होवून तीन महिने उलटलेले असताना आता पुन्हा एकदा हा विषय मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य उमेदवारांना न्यायालयाच्यावतीने समन्स  बजावले आहेत.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. संपूर्ण कोकणातून शरद पवार राष्ट्रवादी गटातून केवळ याच एका जागेवर निवडणूक लढवली गेली होती. खुद्द शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आदींच्या सभा चिपळूणमध्ये झाल्या होत्या. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत मतमोजणीच्या वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार फेर मतमोजणी झाली होती. त्यानंतर आमदार शेखर निकम यांना विजयी घोषित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार शेखर निकम यांनी ग्रामपंचायतींना संगणक वाटले, मानहानीकारण भाषण केले, असे अनेक मुद्दे यात नमूद करण्यात आले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार शेखर निकम, उमेदवार अनघा कांगणे, प्रशांत भगवान यादव, महेंद्र जयराम पवार, शेखर गंगाराम निकम यांच्यासह निवडणूक आयोग यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत. या सर्वाना कोर्टात म्हणणे मांडण्यासाठीचा अवधी देण्यात आला आहे. सुजय हेमंत गांगल हे मुंबई उच्च न्यायालयातील वकील असून त्यांच्यामार्फत ही समन्स बजाविण्यात आली आहे. विरोधी उमेदवाराने निकालाच्या दिवशी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ती मान्य झाली. आता तीन महिन्यानंतर न्यायालयात जायचे, काहीही आरोप करायचे हे योग्य नाही. आम्ही आमचे म्हणणे कोर्टासमोर मांडले आहे. शेखर निकम, आमदार