अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विश्रांती घेतल्यानंतर तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाला आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून दक्षिणेतील राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवमान विभागानं वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत सातारा आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. इतरही काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळल्या आहेत.सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात मान्सूनच्या पावसाचे ढग साचले आहेत. हे ढग येत्या काही तासांत केरळ आणि कर्नाटकाच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहेत. दक्षिणेतील राज्यांसाठी ही चांगली बातमी असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

दरवर्षी १ जूनच्या दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं अर्थातच मान्सूनचं आगमन होतं. पण यंदा तीन दिवस आधीच मान्सूनचा केरळात धडकला आहे. दक्षिण केरळातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मान्सूनच्या पुढील मार्गक्रमणासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रात देखील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान बीड आणि सातारा परिसरात काही ठिकाणी पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे.

पुढील दोन दिवस विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे. हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली परिसरात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre monsoon rains in satara beed in last 24 hours imd gives yellow alert to these districts today live weather update rmm
First published on: 31-05-2022 at 11:03 IST