काँग्रेस खासदार राहुल गांधी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. अशातच आता राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“हे सुडाचं राजकारण आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले आहेत. अघोषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधींना प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात नरेंद्र मोदी अपयशी होत आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत घट होत आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा : “संजय राऊतांना राज्यात दंगली घडवायच्या असतील, त्यामुळेच…”; ‘त्या’ टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

“काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रेमुळे लोकप्रियता मिळाली आहे. पण, राहुल गांधींचा संसदेतील आवाज बंद करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांच्या शिक्षेबाबतची टांगती तलवार अद्यापही राहुल गांधींच्या डोक्यावर आहे. शिक्षा स्थगित ठेवली, तरी अपील करावी लागेल. अपीलात काय होईल माहिती नाही,” असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

हेही वाचा : “लोकप्रतिनिधींमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात” अजित पवारांचा गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल, म्हणाले, “त्यांच्या पत्नीला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकाबाजूला शिक्षा करून दोन वर्ष तुरूंगात डांबायचं, दुसरीकडे त्यांची खासदारकी रद्द करून आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. ही पूर्णपणे सुडभावनेतून करण्यात आलेली कारवाई आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून चालू आहे. कटकारस्थान रचून हे करण्यात आलं,” अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर केली आहे.