दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेतील विजेत्यांना ढाल, स्मृतिचिन्ह, चषक याचबरोबर रोखीने बक्षिसांची खैरात करण्याची पध्दत सगळीकडेच आहे. मात्र वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे.

वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्यावतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्य़ातील वा जिल्ह्य़ाबाहेरील ३० हून अधिक संघ सहभागी झाले आहेत. एरवी खरेतर हा स्थानिक विषय परंतु या स्पर्धेसाठी ठेवलेल्या बक्षिसांमुळे ही एकूण स्पर्धाच सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. कुठल्याही स्पर्धेत विजेत्यांसाठी सामान्यपणे ढाल, स्मृतिचिन्ह, चषक किंवा बरोबरीने रोख बक्षिसे देण्याची पध्दत असते. मात्र वाळवा तालुक्यातील या स्पर्धेसाठी आयोजकांकडून चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा प्रकारच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी मेंढा, द्वितीयसाठी बोकड, तृतीयसाठी १५, चतुर्थसाठी १० तर उत्तेजनार्थ संघासाठी सहा देशी कोंबडय़ा बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य बक्षिसेदेखील अशीच आगळीवेगळी आहेत. स्पर्धेमध्ये सलग तीन बळी घेणाऱ्या किंवा ३ चौकार मारणाऱ्या खेळाडूला २० अंडी देण्यात येणार आहेत. एखाद्या स्पर्धेसाठी अशा प्रकारची बक्षिसे ठेवण्याचा हा प्रकार सध्या परिसरात सर्वत्र चर्चेला आला आहे. या पूर्वी अशा प्रकारची बक्षिसे ठाणे जिल्ह्य़ातील काही स्पर्धामध्ये दिली गेली आहेत.

शरीर संवर्धनाचा विचार

स्पर्धेसाठी रोख रक्कम ठेवली तर ती तत्काळ ढाब्यावरील मेजवाणीवर खर्च होते. या पैशाचे मोल राहत नाही आणि खेळातून शरीर संवर्धनाचा संस्कार रुजत नाही. हाच विचार करत आम्ही रोख रकमेऐवजी मेंढा, बोकड, देशी केंबडय़ा आणि अंडी अशी बक्षिसे जाहीर केल्याचे ‘साथीदार ग्रुप’चे अभिजित वाटेगावकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prizes for sheep goats and hens for cricket abn
First published on: 27-02-2021 at 00:04 IST