पिंपरी : आयपीएलच्या गुजरात टायटन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यावर बेटिंग उपयोजनद्वारे जुगार लावून नागरिकांकडून पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दहा आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली.
सूर्यप्रताप कौशल्य सिंग, (वय १८), शुभम पुलसी धरू (वय २२), राजेश छोटेलाल कुराबहू (वय २५), तिलेश अमितकुमार कुरेह (वय २५), जितू नवीन हरपाल (वय २८), राहुलकुमार प्रकाश कुमार उराव (वय २२), यश प्रसाद शाहू (वय १८), किशन मनोज पोपटानी (वय २२), समया सुखदास महंत (वय २६, सर्व रा. छत्तीसगड), रणजितसरजु मुखिया (वय २०, बिहार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर कार्तिक ऊर्फ दिनेश आहुजा (रा. नागपूर), रामू बोमन (रा. छत्तीसगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुनिल काटे यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा…घरे घेण्यासाठी कोणत्या शहरांना पसंती?… वाचा सविस्तर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. गुरूवारी गुजरात टायटन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघाचा सामना झाला. या सामन्यावर बेटिंग उपयोजनद्वारे आरोपी जुगार लावून नागरिकांकडून पैशांची देवाण-घेवाण करत होते. बनावट बँक खाते उघडून क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे घेत होते. याची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल करून दहा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ५८ हजार रूपये किंमतीचे साहित्य जप्त केले आहे.