तब्बल १८ दिवसानंतर बैठक घेतली
दर्डा वायपीएस अर्थात यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घडलेल्या बाललैंगिक अत्याचार घटनेच्या संदर्भात विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी येथे आलेले बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव डॉ. ए.एन. त्रिपाठी यांनी शुक्रवारी महसूल, शिक्षण, पोलीस आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकरणाशी संबंधित सर्व कायद्यांची माहिती दिली.
दर्डा वायपीएस प्रकरण घडून १८ दिवस झाल्यानंतर आयोगाच्या सचिवांनी घेतलेल्या बैठकीत आढावे आणि दिलेल्या प्रशिक्षणाची फलश्रूती काय, असाही प्रश्न चर्चेत होता. उल्लेखनीय म्हणजे, आयोगाचे फक्त सदस्य सचिव असलेले डॉ. ए.एन. त्रिपाठी यांनीच यवतमाळला भेट देऊन कर्तव्यपरायणता दाखवली. बाकी अध्यक्ष आणि इतर चमू यांच्यापैकी कुणीही वायपीएस प्रकरणाची दखल घेतली नाही.
गेल्या २९ जूनला दर्डांच्या वायपीएस शाळेत इयत्ता पहिलीच्या सहा वर्षीय बालिकेवर शिक्षकांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यभर गाजल्यावर, तीन दिवस प्रचंड आंदोलन झाल्यावर, तसेच संबंधित दोन शिक्षकांना संस्थेने बडतर्फ केल्यावर शासनाने शाळेवर सरकारी नियंत्रकाची नियुक्ती केली आहे. यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर हे दोन आरोपी शिक्षक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक झाल्यावर आणि पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयाने तीन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यासोबत मुख्याध्यापक जेकब दास हेही आरोपी असून त्यांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दर्डा आणि दास दोघेही आता जामिनावर सुटले आहेत. या सर्व प्रकरणाचा आढावा घेणे आणि तपास करणे यासाठी राज्य महिला आयोग, जिल्हा महिला दक्षता समिती, विशेष पोलीस महानिरीक्षक, मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यापासून अनेक संघटना यवतमाळात येऊन गेल्या.
बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव डॉ. ए.एन. त्रिपाठी गुरुवारी रात्री यवतमाळात आले. त्यांनी प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा केली. शुक्रवारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषेदेचे कार्यपालन अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी, बाल व महिला कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना बालकांचे हक्क आणि त्यांच्या संरक्षणासंबंधी असलेल्या विविध कायद्यांबद्दलची कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण दिले.