बीड : फलटण मधील महिला डॉ.दिवंगत संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी वडवणी शहर आणि तालुक्यात बंद पाळण्यात आला. दिवंगत डॉक्टरचे मूळ गाव हे वडवणी तालुक्यातील कवडगाव असल्याने फलटपण प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये उमटू लागले आहेत.
हा बंद सर्वपक्षीय नेत्यांनी पाळला असून वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे बीड – परळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
राज्यभरात गाजत असलेल्या फलटण येथील डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मंगळवारी वडवणीतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी आणि सर्वपक्षीय संघटनांकडून बंद पुकारण्यात आला.
या घटनेतील सर्व आरोपींवर तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून काही आंदोलकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
