Phaltan Women Doctor Sucide Case: फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या डॉक्टर तरुणीने एक चिठ्ठी आणि तळहातावर लिहिलेल्या मजकूरात फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि आणखी एका व्यक्तीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने शनिवारी रात्री उशीरा आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला अटक करून आज फलटणच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी हजर केल्यानंतर, फलटण येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे दोन्ही आरोपी पोलिसांना शरण आले आहेत.
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपनिरिक्षकास निलंबित करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अर्जुन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या संबंधित डॉक्टर तरुणीने येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्या केली होती.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेले आढळले आहे. त्यामध्ये फलटण येथेच कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षक आणि आणखी एका व्यक्तीमुळे आत्महत्या करत असल्याचे या मृत डॉक्टरने लिहिले होते.
या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बदाने याला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. त्यांने फलटण शहर पोलिसांसमोर रात्री आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही माहिती दिली. यापूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती.
