कराड : पुणे – बंगळुरू महामार्गावर प्रवाशी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ‘कुरिअर बॉय’ला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे ७० लाखांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांच्या टोळीने लांबवल्याची घटना वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील कासार गल्लीतील कृष्णा कुरिअरकडून काही सोन्याचा ऐवज मुंबईला पाठविला जाणार होता. कंपनीतील ‘कुरिअर बॉय’ प्रशांत शिंदे हे मंगळवारी रात्री एका बॅगमध्ये तो ऐवज घेवून महामंडळाच्या कोल्हापूर ते मुंबई बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते.

कोल्हापूर- सातारा लेनवरून बस मुंबईकडे निघालेली असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीतील श्रावणी हॉटेलजवळ बस थांबली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवासी लघुशंकेसाठी खाली उतरले. कुरिअर बॉय प्रशांत शिंदे हेही सोन्याचा ऐवज असलेली बॅग सोबत घेवून लघुशंकेसाठी उतरले. त्यानंतर ते परत बसमध्ये चढले. मात्र, तोपर्यंत चोरट्यांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण करीत त्यांच्याकडे असलेली सोन्याच्या ऐवजाची बॅग हिसकावत चोरटे तेथून पसार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्यांनी लांबवलेल्या बॅगमध्ये सुमारे ६५ ते ७० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेले वीस डबे होते. या घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी, तसेच कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेवून अटक केली. तसेच चौकशीत पोलिसांना त्याच्याकडून त्याच्या अन्य साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यानुसार त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.