पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुस्लीम तरुणांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थातच पीएफआयच्या सुमारे ४१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

या घडामोडी घडत असताना मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलने या वादात उडी घेतली आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तातडीने सोडा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू, अशा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते.

मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यावेळी म्हणाले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी करोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता औरंगाबादेत विविध जातीधर्मांच्या लोकांची मदत केली. कोविड मृतावर अंत्यसंस्कार केले. केवळ सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना अटक केली जात आहे. हे खोटे गुन्हे रद्द करुन त्यांची निर्दोष मुक्तता करावी. अशी दडपशाही सहन केली जाणार नाही. आम्ही शांत आहोत, याचा गैरफायदा घेऊ नका. अन्यथा लोकशाही मार्गानि रस्त्यावर उतरू, असा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला.

हेही वाचा- पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या युवकांना अटक झाली त्यांना आम्ही ओळखतो. ते सर्वजण निर्दोष आहेत. या तरुणांचा दोष काय? असे विचारले असता केवळ वरून आदेश आहेत, असे सांगितले जाते. सीमी संघटनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सिद्दिकी म्हणाले की, मागील २५ वर्षांपूर्वी भारतात सीमी संघटनेवर बंदी आहे. या प्रकरणात अटक केलेल्यांना अद्याप न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. तसेच झाकिर नाईक यांच्यावरही बंदी आणण्यात आली. जोपर्यंत न्यायपालिका त्यांना दोषी मानत नाही, तोपर्यंत ते आमच्यासाठी निर्दोष आहेत, अशी प्रतिक्रिया सिद्दीकी यांनी दिली आहे.