राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा टाकण्याचा प्रकार आज सोलापूरमध्ये घडला. त्यामुळे विखे पाटील यांच्याजवळ उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला. हा प्रकार सध्या चर्चेत असून सुरक्षारक्षक असताना कार्यकर्त्यांनी का मारहाण केली? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

“भंडारा हा नेहमीच पवित्र मानला जातो. पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा मला विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते. त्यात त्यांनी काही वावगं केलंय असं मला वाटत नाही. त्यानं अचाकन ती कृती केल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विरोध करत प्रतिसाद दिला. त्यांची ती जबाबदारीच आहे. तरी मी सूचना दिल्या आहेत की गुन्हा वगैरे दाखल करू नका. कोणतीही कारवाई करू नका”, असं राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नेमकं काय घडलं?

राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असून शासकीय विश्रामगृहात ते थांबले असताना हा प्रकार घडला. यावेळी धनगर आरक्षणाची मागणी करणारं निवेदन घेऊन कृती समितीचा एक सदस्य तिथे आला. त्यानं विखे पाटील यांना निवेदन दिलं. हे निवेदन विखे पाटील वाचत असताना या सदस्यानं त्यांच्या डोक्यावर भंडारा टाकला. काही क्षणांत विखे पाटील यांचे सुरक्षारक्षक व कार्यकर्त्यांनी त्याला घेरलं आणि चोप द्यायला सुरुवात केली. त्याला पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं.

कार्यकर्त्यांनी का मारहाण केली?

दरम्यान, तिथे सुरक्षारक्षक असूनही विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण का केली? अशी विचारणा केली असता त्यावर विखे पाटलांनी कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं. “ती कोणत्याही नेत्याची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या क्षणी तसं वाटल्यामुळे त्यांनी ती कृती केली. मी कार्यकर्त्यांना सांगेनच. पण घटनाच अशी होती की कार्यकर्त्यांकडून स्वाभाविक प्रतिक्रिया येणं साहजिक होतं”, असं विखे पाटील म्हणाले.

Video: राधाकृष्ण विखे पाटलांवर कृती समिती सदस्यानं भंडारा टाकला; धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका!

“अचानक घडलेल्या प्रकारामुळे सगळे गोंधळून गेले होते. त्यामुळे तिथे झटापट झाली. त्यामुळे कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मारहाण करण्याची भूमिका मुळीच नव्हती”, असंही त्यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरक्षणाच्या आंदोलनांमागे राजकारण?

दरम्यान, अशा प्रकारच्या आरक्षणाच्या आंदोलनांमागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचाही उल्लेख केला. “दुर्दैवाने आरक्षणाच्या मुद्द्यांमधील राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांचं गांभीर्य संपत चाललं आहे. त्यामुळे माझी सर्व समाजबांधवांना विनंती आहे. जरांगे पाटील किंवा धनगर समाजाच्या तरुणानं आज माझ्यावर भंडारा उधळून जे प्रतीकात्मक आंदोलन केलं आहे, त्यात समाजाच्या भावना म्हणून आपण त्याचा आदर करतो. पण त्यांच्यामागून काही राजकीय मंडळी गैरफायदा घेत आहेत. ते दुर्दैवी आहे. त्यातून समाजाला न्याय मिळत नाही. आंदोलन बदनाम करण्याचा ही मंडळी प्रयत्न करत आहेत”, असं विखे पाटील यावेळी म्हणाले.