scorecardresearch

“घरोबा एकाबरोबर आणि संसार…”, राधाकृष्ण विखे-पाटलांची महाविकास आघाडीवर खोचक टीका!

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

radhakrushna vikhe patil
राधाकृष्ण विखे पाटील

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एक टोळी आहे. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उघडपणे पाठिंबा दिला जात नाही, अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा- डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण; तीन आठवड्यांत CBI भूमिका स्पष्ट करणार

शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्याबाबत विचारलं असता महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, “खरं तर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही एक टोळी आहे. मविआ कुठल्याही विचारसरणीवर, विचारधारेवर किंवा तत्त्वावर एकत्र आलीच नव्हती. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, ही महाविकास आघाडीची अवस्था आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आधार घेऊन निवडून आली. नंतर ते महाविकास आघाडीसोबत गेले. त्यामुळे ते टिकले नाहीत.”

हेही वाचा- …म्हणून राहुल गांधींनी कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घातला, भारत जोडो यात्रेदरम्यानचा सांगितला ‘तो’ प्रसंग

“अनेक मुद्यांवरून शिवसेनेची मागील २५ वर्षांपासून भाजपासोबत युती होती. आता शिवसेनेच्या ठाकरे सेनेनं हिंदुत्वापासून पूर्ण फारकत घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण विचारधारा नसलेली मंडळी जेव्हा एकत्र येते, मग सत्तेची समीकरणं कशी आहेत? कोण कशा पद्धतीने वागतो, याचा अधिक विचार होतो”, अशी टीका विखे-पाटलांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:23 IST