कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस पीक वाढवण्याच्या हालचाली म्हणजे शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे. ही बारामतीकरांची भानामती आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘राज्य शासन, राज्य बँक, राज्य साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस पीकवाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. आधीच शेतकरी कर्जात अडकलेला आहे. कर्जमाफी लवकर होताना दिसत नाही. तरीही शेतकऱ्यांना पुन्हा कर्जात टाकून काय फायदा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आधीच्या लाभाचे काय?
यापूर्वीही आसवनी, सहवीजनिर्मिती, इथेनॉलनिर्मिती यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असे आमिष दाखवले गेले. परंतु ऊसउत्पादक शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षे २७०० रुपये भरून ३ हजार रुपये प्रतिटन रक्कम मिळत आहे. ऊस उत्पादनाचा खर्च वाढला आहे, असे ते म्हणाले.
राज्यव्यापी शेतकरी प्रबोधन मोहीम
ऊस उत्पादनात वाढ होणार असे आमिष बारामतीकर दोन्ही पवार देत आहेत. त्याला सत्तेच्या मोहाने मुख्यमंत्री, राज्य शासन बळी पडत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. याविरोधात आजपासून राज्यव्यापी शेतकरी प्रबोधन मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.