Rahul Gandhi in Kolhapur : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहिले. दरम्यान, विमानतळावर उतरून ते थेट एका सामान्य कुटुंबाच्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांनी स्वतः स्वयंपाक करून त्या कुटुंबाला जेवूही घातलं. या भेटीवरून त्या दाम्पत्याने प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ ने त्यांच्याशी संवाद साधला.

राहुल गांधी अजयकुमार सनदे यांच्या घरी गेले होते. याबाबत अजयकुमार सनदे म्हणाले, राहुल गांधी आमच्याकडे येणार आहेत, याची आम्हाला कल्पना नव्हती. पण दलित कुटुंब निवडून ते माझ्या घरी आले. माझ्या घरी येऊन अर्धा तास आले. मला अतिआनंद आहे. त्यांचे पाय आमच्या घराला लागले, यातच आम्हाला सार्थकी लागल्यासारखं वाटतंय.

अजयकुमार सनदे यांच्या पत्नी म्हणाल्या, राहुल गांधी आमच्या घरी आले हे आमचं भाग्यच आहे. त्यांनी भाकरी, हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी आणि कांद्याची पात बनवली. भावासारखं त्यांनी केलं. त्यांच्या हातचं आम्हाला खायला मिळालं हे आमचं भाग्य आहे. तर, अजयकुमार सनदे यांच्या मुलाने सांगितलं की, ते आमच्या घरी आलेत याचा आम्हाला अभिमान आहे. ते स्वतःहून आमच्याकडे आले होते. तसंच, यावेळी त्यांनी येथील उपस्थित तरुणींशीही संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

हेही वाचा >> “शिवाजी महाराजांचा विचार म्हणजेच संविधान, पण या संविधानाला…”; कोल्हापुरातील सभेतून राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल!

राहुल गांधींची सरकारवर टीका

या दाम्पत्याच्या घरी जवळपास अर्धा पाऊण तास घालवल्यानंतर राहुल गांधी यांनी कोल्हापुरात जनतेला संबोधित केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. “आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबंध आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. त्यांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखी लोक जन्माला आली नसती, तर आपलं संविधानही नसतं. भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आहे”, असंही राहुल गांधी म्हणाले.