Rahul Narwekar Assembly Speaker : भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे. राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित आहे कारण दुसऱ्या कुणीही या पदासाठी अर्ज भरलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपादासाठी राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी अर्ज दाखल केला. आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तोपर्यंत राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) वगळता कुठलाही अर्ज आलेला नाही त्यामुळे त्यांची निवड ही निश्चित मानली जाते आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
“महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मी आभार मानतो कारण या सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास दाखवत मला महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे. मी सगळ्या विधीमंडळ सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की भाजपा ही पार्टी विथ डिफरन्स म्हणून मानली जाते. ज्यावेळी कुठल्याही पदाची जबाबदारी दिली जाते तेव्हा त्याचं वय किंवा त्याचा अनुभवच ग्राह्य धरला जात नाही तर त्याचं मेरिट पाहिलं जातं. युथला प्रमोट करण्याचं काम भाजपाने सातत्याने केलं आहे. त्यामुळे ही निवड दिसून येते आहे.” असं राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) म्हणाले. तसंच त्यांनी विरोधकांवरही टीका केली.
हे पण वाचा- विशेष अधिवेशन आजपासून: नव्या सदस्यांना शपथ, सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड
विरोधकांबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?
“लोकशाहीवर विरोधकांचा विश्वास नाही म्हणूनच मरकडवाडीमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न होतो आहे. आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्यात आली. त्यावेळी कुणीही कसलीही तक्रार केली नाही. आता मनाविरुद्ध कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं, हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधक करत आहेत. मला वाटतं की येणाऱ्या काळात संविधानिक संस्थांवर असे आरोप न करता आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला जो कौल आहे तो स्वीकारायला शिकलं पाहिजे. त्या जनमताचा अवमान होणं योग्य नाही.” असंही नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी म्हटलं आहे.
माझ्यावरही टीका झाली पण त्रुटी कुणीही दाखवू शकलं नाही-राहुल नार्वेकर
माझ्यावरही या पूर्वी अनेक लोकांनी टीका केली. पण टीका करण्याशिवाय दुसरं काहीही त्यांनी केलं नाही. कारण मी दिलेला निकाल आहे त्यात त्रुटी दाखवण्यात कुणीही यशस्वी झालेलं नाही. उद्यापासून मी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करेन तेव्हा सगळ्या सहकाऱ्यांची साथ मला लाभेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन निःपक्षपातीपणे सगळ्यांना समान न्याय मिळेल असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. मला आज कुठल्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करायचं नाही. जनतेचा निर्णय हा अंतिम आहे. जनतेचा कुणावर विश्वास आहे ते जनमतातून दिसून आलं आहे असंही राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी स्पष्ट केलं.