अलिबाग – सहा महिन्यांनंतर अखेर रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नुतन इमारतीच्या कामाला अखेर सुरवात होणार आहे. या कामातील सिआऱझेड क्षेत्रातील बांधकामाचा अडसर दूर झाला आहे. एमसीझेडएमए कमिटीने इमारतीच्या कामाला मंजूरी दिली असून, दोन दिवसात इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
जिल्हा रुग्णालयाची अंतर रुग्ण विभागाची इमारत जीर्ण झाल्याने, राज्यसरकारने रुग्णालयाची नवीन इमारत उभारण्याच्या कामाला मंजूरी दिली होती. त्यानंतर ५ मार्चला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयाच्या इमारतीचा भूमीपुजन सोहळा पार पडला होता.
मात्र सिआरझेड परवानगी न मिळाल्याने प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नव्हते. सीआरझेड मधील बांधकामांना मंजूरी देण्यासाठी राज्यात एमसीझेडएमए कमिटी स्थापन करण्यात आली आहे.
मात्र जुन्या कमिटीचा कार्यकाळ डिसेंबर २०२४ मध्ये संपला होता नवीन समितीचे गठन होण्यास उशीर झाल्याने, सिआरझेड परवानग्यांसाठी दाखल प्रस्तावांवर निर्णय होऊ शकला नव्हता. आता नवीन समिती स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचा बांधकाम प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
एमसिझेडएमए समितीच्या मंजूरीनंतर ज्या ठिकाणी नवीन इमरातीचे काम केले जाणार आहे. तेथील ऑक्सीजन प्लांट तातडीने स्थलांतरीत करण्यात आला आहे. तर रक्तपेढीची इमारत खाली करण्याचे काम तातडीने सरू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसात प्रत्यक्ष इमारतीच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
नवीन रुग्णालय सुविधांसह एकूण ३०० खाटांचे असणार आहे. सध्याच्या जागेतच ही २ लाख चौरस फूट सात मजली इमारत उभी करण्यात येणार आहे. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या मानांकनानुसार खूप अद्ययावत असे रुग्णालय उभे राहणार आहे. पाच लिफ्ट आणि दोन जिने असणार आहेत.
मोठे २० खाटांचे डायलिसिस सेंटर, १६ खाटांचे आयसीयू विभाग, अपघात विभाग, अपघात विभागासाठी एक स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, पाच स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ३२ बेडचे बाल रुग्ण विभाग नूतन इमारतीत असणार आहे. यासाठी १५० कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे.
रक्तपेढी लहान मुलांच्या कक्षात स्थलांतरीत होणार
रुग्णालयाच्या लहान मुलांच्या कक्षात रक्तपेढी हलविण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने रक्तपेढीचे कार्यालय उभारण्यासाठी व साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यानंतर जुनी इमारत पाडली जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयाची इमारत सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने, नवीन इमारत बांधण्यासाठी अद्यापपर्यंत एमसीझेडएमए समितीची परवानगी आवश्यक होती. ती आता मिळाली आहे. त्यामुळे दोन दिवसात रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू होईल. – एम. एम. धायतडक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग.