अलिबाग : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी साडे सात कोटींचा निधीही जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. पण ॲग्रीस्टॅकचा सक्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणात अडचणी येत आहेत.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने आणि परिणामकारकरित्या पोहोचविता यावा याकरिता कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबवण्यात येत आहे. यासाठी खातेदार शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत. त्यामुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना निधी वितरीत करण्यात अडचणी येत आहेत.

रायगड जिल्‍ह्यात एकूण ३ लाख ३ हजार ८४४ खातेदार शेतकरी आहेत. त्‍यापैकी १ लाख १९ हजार ९५९ खातेदारांनी फार्मर आयडी रजिस्‍टर केले आहे, त्यामुळे अजूनही जवळपास २ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाहीत. त्यांना मदत वाटपात अडचणी येत आहेत.

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात ७ हजार २६३ हेक्टर क्षेत्रावरी शेतीचे नुकसान झाले. ७ कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचे मदत अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र अँग्रीस्टॅकची सक्ती हा मदत वाटपातील मोठा अडसर ठरत आहे.

अँग्रीस्टॅक म्हणजे काय….

अॅग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी हे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्व समावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रीस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा देणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅकसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

मदत वाटप निधी प्राप्त झाला आहे. पंचनामे करून मदत वाटपासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यास दोन दिवसांत मंजूरी मिळेल त्यानंतर मदत वाटपाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात होईल. पण जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक योजनेसाठी नोंदणी केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांची अँग्रीस्टॅकसाठी नोंदणी झालेली नाही, त्यांना मदत वितरण करण्यात अडचणी येणार आहेत. – संदेश शिर्के, निवासी उप जिल्हाधिकारी रायगड.

शेतकरयांचे शेतातील भाताचे पीक आता घरी आणण्‍याच्‍या अवस्‍थेतही राहिलेले नाही. त्‍यामुळे शेतकरी अवकाळीने पूर्णपणे उद्ध्‍वस्‍त झाला आहे. त्‍यामुळे शासनाने मागेपुढे न पाहता सरसकट पंचनामे करून शेतकरयांना भरपाई द्यावी अशी मागणी शेकापने शासनाकडे केली आहे. कुठल्याही जाचक अटी न लावता मदत वाटप सुरू करावे. – चित्रलेखा पाटील, राज्‍य प्रवक्‍त्‍या , शेकाप