अलिबाग : गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार करा असा शासनाचा आदेश असताना रायगड जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागात काम करणारे आणि दुर्गम ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारे शेकडो कर्मचारी आजही पगारापासून वंचित आहेत. गणेशोत्सव संपला तरी या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव पगाराविनाच साजरा करावा लागला आहे.
27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे आगमन झाले.गणेशोत्सवाची धामधूम आणि उत्सवासाठी होणारा खर्च लक्षात घेवून सणांच्या दिवसात कुठलीही अडचण येवू नये सर्व सरकारी कर्मचारयांचे पगार 25 ऑगस्टपर्यंत करावेत असा आदेश सरकारने काढला होता. त्यानुसार बहुतांश कर्मचारयांचे पगार योग्य वेळेत त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले. परंतु आरोग्य विभागातील कर्मचारी गणेशोत्सव काळात पगारापासून वंचित राहिले.
आरोग्य विभागातील सेवक , सहायक, सहायिका, आशासेविका, गटप्रवर्तक, मदतनीस यांना अद्याप पर्यंत पगार मिळालेला नाही. गणेशोत्सव काळात हे सर्व कर्मचारी पगाराची वाट पहात होते मात्र जिल्हा परीषद आरोग्य विभागाच्या दफ्तर दिरंगाईमुळे या कर्मचारयांना पगारापासून वंचित रहावे लागले. हे सर्व कर्मचारी गावपातळीवर गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. महत्वाच्या सेवेत असतानाही दफ्तर दिरंगाईचा फटका या कर्मचारयांना बसला आहे.
आरोग्य कर्मचारी संघटनेने यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून या कर्मचारयांचे पगार झाल्याचा दावा करण्यात येत असला अद्यापपर्यंत एकाही कर्मचारयाच्या बँक खात्यात पगार जमा झालेला नाही. दुसरीकडे पगाराला उशीर होण्यामागे तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे सरकारने काढलेल्या खास शासन नि र्णयाला हरताळ फासण्याचे काम रायगड जिल्हा परीषदेच्या आरोग्य वि भागाने केले आहे.
नेहमीचीच तक्रार
आरोग्य विभागातील कर्मचारयांची पगाराबाबत नेहमीच तक्रार असते. पगार वेळेवर होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता येत नसल्याने दंड भरावा लागतो शिवाय सी बील स्कोअरवर देखील याचा परीणाम होतो. अशा तक्रारी वारंवार वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या होत्या. आरोग्य मंत्रयांकडे कर्मचारी संघटनांनी देखील तक्रारी करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकारयांसाठी पत्र जारी केले आणि आरोग्य वि भागातील सर्व कर्मचारयांचे पगार प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला करावेत अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तरीदेखील पगारासंदर्भात बोंब सुरूच आहे.
तांत्रिक कारणामुळे पगार वितरीत करण्याचे काम रखडले होते. यात आरोग्य विभागाचा दोष नाही आम्ही दि. 4 सप्टेंबर रोजी सर्व कर्मचारयांचे प्रलंबित पगार अदा केले आहेत. दोन दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होईल. – डॉ. मनिषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी