अलिबाग- मुरुड तालुक्यातील कोर्लई जवळ रडारवर आढळून आलेल्या संशयास्पद बोटीचे गूढ अखेर उकलले आहे. तटरक्षक दलाच्या रडारवर रविवारी रात्री दिसलेली संशयास्पद बोट नसून तो जिपीएस ट्रॅकर असलेला जाळीचा बोया असल्याची बाब तटरक्षक दलाच्या पहाणीत समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांसह सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यातील दिपगृहापासून सुमारे अडीच ते तीन सागरी मैल अंतरावर पाकिस्तानी बोट मकदार बोया ९९ संशयास्पद रित्या वावरत असल्याचा संदेश दिल्लीतील तटरक्षक दलाच्या मुख्यालयातून पोलीस प्रशासनाला प्राप्त झाला. यानंतर रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. रायगड पोलीस, तटरक्षक दल, मेरीटाईम बोर्ड, महसूल विभागाच्या यंत्रणानी थेरोंडा, कोर्लई परिसरात धाव घेतली. बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बोट कुठेच आढळून आली नाही.
रात्रीपासून पोलीसांनी मुरुडसह अलिबाग परिसरात १९ ठिकाणी नाकाबंदी करत संशयित व्यक्तींचा शोध सुरू केला. बॉम्ब शोधक पथक, सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले. सर्व लॅण्डीग पॉईंट्सची तपासणी करण्यात आली. हॉटेल्स, लॉजेस, होम स्टे यांची कसून तपासणी करण्यात आली. निर्मनुष्य ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली. ५२ पोलीस अधिकारी ५५४ कर्मचारी रात्रदिवस तपासकामावर लावण्यात आले. अलिबाग परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलीसांनी कसून तपासणी सुरु करण्यात आली. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रात्री थेरोंडा येथे जाऊन मच्छीमार आणि स्थानिकांशी संवाद साधत विचारणा केली. सकाळी पुन्हा एकदा बोटीबद्दल ग्रामस्थांकडे विचारणा केली मात्र थेरोंडा परिसरात कुठलीही परदेशी बोट आली नसल्याचे स्थानिकांनी सांगीतले. कोकणचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनीही रेवदंडा आणि थेरोंडा येथे पहाणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. संशयित बोटीच्या शोधासाठी तटरक्षक दल, नौदलाच्या नौका आणि हेलिकॉप्टरची च्या मदत घेण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाकडून किनारपट्टीवरील भाग पिंजून काढण्यात आला. मात्र बोटीचा शोध लागला नाही. त्यामुळे संशयीत बोटीचे गूढ कायम होते.
मात्र आता तटरक्षक दलाच्या रडारवर दिसलेली ती पाकिस्तानी बोट नसून, तो मासेमारी जाळी बुडू नये यासाठी वापरण्यात येणारा जिपीएस ट्रॅकर असलेला बोया असल्याचे निष्पन्न झाले आहे. तटरक्षक दलानेच याबाबतची पुष्टी पोलीस दलाकडे केली आहे. यापुर्वी ३ जानेवारी २०२५ गुजरात समुद्र किनाऱ्यावर आढळून आला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणासह स्थानीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
संवेदनशील सागरी किनारा…
१९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरण्यात आलेली स्फोटके ही रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी समुद्र किनाऱ्यांवर उतरवण्यात आली होती. तर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांनी मुंबईत प्रवेशासाठी सागरी मार्गाचा आधार घेतला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.
मुरुड येथील कोर्लई जवळ संशयीत बोट असल्याचा संदेश तटरक्षक दलाकडून प्राप्त झाला होता. पोलीसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. शोध मोहीम राबविण्यात आली होती. मात्र आता ती बोट नसून जिपीएस ट्रॅकर प्रणाली असलेला बोया असून एआयएस ट्रान्सपॉन्डरसह भारतीय सागरी हद्दीत वाहून असल्याचे तटरक्षक दलाकडून कळविण्यात आले आहे. – आंचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड…