अलिबाग – हस्त नक्षत्रावर आलेल्या पावसाचा रायगड जिल्ह्यातील भात शेतीला तडाखा बसला आहे. जिल्ह्यात आठवडाभरात २ हजार १८५ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कर्जत, पेण, खालापूर आणि अलिबाग तालुक्यातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात पिक परिस्थिती यंदा बरी होती. वार्षिक सरासरीच्या तुलनेत कोकणात कमी पाऊस झाला. मे आणि जुन महिन्यात सरासरीच्या तुलनेत चांगलापाऊस झाला. मात्र जुलै आणि ऑगस्ट मध्ये पर्जन्यमान कमी होते. मात्र सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या, अनियमित पाऊस असूनही यंदा भाताचे पिक जोमाने आले होते.

शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनांची अपेक्षा होती. मात्र लोब्यांमध्ये दाणे भरण्यास सुरवात झाली असतांनाच हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तयार होत आलेले पिक वादळी वारे आणि पावसामुळे आडवे झाले आहे. पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पिक पावसामुळे नष्ट झाले आहे.

पेण मधील ७५६ हेक्टर, कर्जत ७३१ हेक्टर, उरण २४४ हेक्टर, अलिबाग २३८ हेक्टर तर तळा आणि रोहा येथे सुमारे ५० हेक्टरवरील भात शेतीला हस्ताच्या नक्षत्रावर पडलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. एकूण ५ हजार ८७८ शेतकऱ्यांचे ३३ टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. ६०६ गावातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे कृषी विभागाने शासनाकडे १ कोटी ८५ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. त्यापूर्वी जून ते ऑगस्ट या कालावधील ६६ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात ९० हजार हेक्टर हे खरीप लागवडीखालील क्षेत्र असून यावर्षी ७० हजार ६६६ हेक्टरवर यावषी खरीपाची लागवड करण्यात आली होती. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे यावर्षी लागवड क्षेत्रात २० हजार हेक्टरची घट झाल्याचे दिसून आले होते.

पावसाबरोबर आलेल्‍या वाऱ्यामुळे रायगड जिल्‍हयात भातपिकांचे नुकसान झाले आहे. अलिबाग, पेण कर्जत खालापूर उरण तालुक्‍यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. आमच्‍या विभागातर्फे पंचनाम्‍यांचे काम सुरू करण्‍यात आले आहे. पंचनामे पूर्ण झाल्‍यानंतर याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. – वंदना शिंदे, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी.