अलिबाग : रायगड पोलीसांनी बांग्लोदशी घुसखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. जिल्हयातील इंदापूर इथं माणगाव पोलीसांनी दोन बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
इंदापूर गावातील दळवी चाळीच्या परिसरात दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळताच, पोलिसांनी तात्काळ पथकासह तेथे धाव घेतली. 13 ऑगस्ट रोजी सकाळीच पोलिस पथक दळवी चाळीत दाखल झाले. माजिदा बेगम मोहम्मद जहांगीर आलम (38 वर्षे), ग्राम मेरेडिया भुईयापारा, पोस्ट ऑफिस खिलगाव, राज्य ढाका आणि रसेल मोहम्मद फारूक हुसेन (29 वर्षे), रा. श्रीरामपूर, पो. झिकरगाछा, जिल्हा जेशोर, हे दोन्ही बांगलादेशी नागरिक कोणताही वैध व्हिसा, पासपोर्ट किंवा परवानगीशिवाय भारतात प्रवेश करून वास्तव्य करत होते.
कायदेशीर पावले उचलली
दोन्ही घुसखोरांविरुद्ध विदेशी नागरिक कायदा व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुप्तचर विभागाची सजगता अधोरेखित झाली आहे.
बांगलादेशी घुसखोरांची उपस्थिती उघड झाल्यानंतर इंदापूर व आसपासच्या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “सीमेपलीकडून अशा पद्धतीने कोणीही सहज प्रवेश करू शकतो का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी मात्र जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. रायगड जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये अशा प्रकारच्या गुप्त कारवायांवर पोलिसांचे काटेकोर लक्ष असून भविष्यात अशा घुसखोरीला आळा घालण्यासाठी पाळत ठेवण्याची प्रक्रिया अधिक मजबूत करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.