अलिबाग – सुधागड तालुक्‍यातील हातोंड बौदधवाडी आणि गोंदाव या दोन गावातील दरोडयाचा तपास करण्‍यात रायगड पोलीसांना यश आले आहे. यामध्‍ये सहा आरोपींना अटक करण्‍यात आली असून त्‍यांचा एक साथीदार फरार असल्‍याची माहिती पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली.

अजय चव्‍हाण, आकाश चव्‍हाण, सुनील चव्‍हाण, मल्‍हारी चव्‍हाण, सोमनाथ चव्‍हाण आणि सुजल चव्‍हाण अशी अटक आरोपींची नावे आहेत. २६ जुलै रोजी रात्रीच्‍या सुमारास सुधागड तालुक्‍यातील हातोंड बौद्धवाडी आणि गोंदाव या गावांमध्‍ये 6 ते ७ जणांच्‍या टोळक्‍याने सशस्‍त्र दरोडा टाकला होता. यात सहा ते सात घरांना लक्ष्‍य करून घरातील व्‍यक्‍तींना शस्‍त्रांचा धाक दाखवून घरातील दागिने, पैसे आदि वस्‍तू लुटून नेल्‍या होत्‍या.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीसांची दहा पथके तयार केली आणि तपासासाठी वेगवेगळया ठिकाणी पाठवली. या पथकांनी गुप्‍त माहिती आणि तांत्रिक विश्‍लेषणाच्‍या आधारे कौशल्‍यपूर्ण तपास करून सर्व सहा आरोपींना एकाच वेळी वेगवेगळया ठिकाणांहून ताब्‍यात घेतले. त्‍यांनी गुन्‍हयाची कबुली दिली असून आणखी अशाच प्रकारचे दोन गुन्‍हे केल्‍याचे मान्‍य केले आहे. गुन्‍हयातील मुद्देमाल कुठल्‍या ठिकाणी विकला याची माहिती मिळाली असून तो परत मिळवण्‍याची कार्यवाही सुरू असल्‍याची माहिती पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली. यातील अजय चव्‍हाण या आरोपीवर रायगडसह राज्‍याच्‍या वेगवेगळया भागात तब्‍बल 6 गुन्‍हे दाखल आहेत. आरोपी आकाश चव्‍हाण याच्‍याविरोधात तीन तर सुनील चव्‍हाण याच्‍या विरोधात पाच गुन्‍हे दाखल आहेत. ठाणे गामीण पोलीस कार्यक्षेत्रात मुरबाड आणि टकवडे पोलीस ठाण्‍याच्‍या हददीतील गुन्‍हे उघड झाले आहेत.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर, स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्‍कर जाधव, मानसिंग पाटील, उपनिरीक्षक लिंगप्‍पा सरगर, पोलीस पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक शेरेकर, उपनिरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक निकम, उपनिरीक्षक गोसावी आणि कर्मचारयांनी या तपासात भाग घेतला.

गुन्‍हयाच्‍या तपासात आरोपींना ताब्‍यात घेतल्‍यानंतर त्‍यांची गुन्‍हा करण्‍याची पदधत समोर आली.यातील एक आरोपी टेंपोमधून खेडेगावात भाजी विकण्‍याचा व्‍यवसाय करतो. हा भाजीचा व्‍यवसाय करीत असताना गावातील घरांमध्‍ये कुणी वयस्‍क व्‍यक्‍ती आहे का, महिलांच्‍या अंगावर कुठले दागिने आहेत याची रेकी करत असे. त्‍यानंतर कुठल्‍या घरावर दरोडा टाकायचा याचे नियोजन करून गुन्‍हा केला जात असे.