अलिबाग- देशातील विवीध भागात चार चाकी वाहनाने जाऊन रेकी करून घरफोड्या करणारी टोळी रायगड पोलीसांनी जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाने या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि २४ बंदूकीच्या गोळा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीतील अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
वेगवेगळ्या जिल्ह्यात चार चाकी गाडीने जाऊन, लॉजवर राहून नंतर आसपासच्या परिसराची रेकी करायची आणि नंतर दिवसा घरफोड्या करून पसार व्हायचे ही या टोळीची कार्यपध्दती होती. गाडीला वेगवेगळ्या नंबर प्लेट लाऊन हे सर्वजण घरफोड्या करत होते.
मात्र पोलीसांनी कौशल्यपूण तपास करत शाहनवाज इकराम कुरेशी (वय ५० वर्षे ) , हिना शाहनवाज कुरेशी या दोघाना उत्तरप्रदेशमधील सिंकंदराबाद, जिल्हा – बुलंदशहर येथून अटक केली. त्यानंतर शमीम इस्लाम कुरेशी, (वय. ४२ वर्षे ) याला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून अटक केली. नौशाद इकराम उर्फ इमरान उर्फ इकरामुद्दीन कुरेशी, एहसान (दोघेही राहणार सिकंदराबाद, उत्तरप्रदेश) हे दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
महत्वाची बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी रायगड , रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये केलेल्या १० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाहनवाज इकराम कुरेशी याच्या विरुद्द उत्तरप्रदेश व हरियाणा या दोन राज्यतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २३ गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सह सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोलीस हवालदार प्रतिक सावंत, पोलीस हवालदार श्यामराव कराडे, पोलीस हवालदार रविंद्र मुंढे, पोलीस हवालदार अवाय पाटील, पोलीस हवालदार सचिन वावेकर, पोलीस हवालदार अक्षय आधव, महिला पोलीस हवालदार रेखा म्हात्रे, पोलीस हवालदार सुदीप पहेलकर, पोलीस शिपाई अक्षय जगताप, पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे, पोलीस शिपाई बाबासाहेब पिंगळे, पोलीस शिपाई ओंकार सोंडकर, रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रशांत लोहार यांनी महत्वाची कामगिरी बजावली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील पुढील तपास करीत आहेत.
या गुन्ह्यामधील मुख्य सुत्रधार शाहनवाज इकराम कुरेशी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर देशातील विवीध भागात २३ गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यासाठी येणाऱ्यांवर सशस्त्र हल्ले करण्याचे प्रकार त्याने यापुर्वी केले होते. पण स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्याला ५ अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांसह छापा टाकून अटक केली आहे. या कारवाईमुळे घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड
