अलिबाग- दुसरे लग्न करता यावे यासाठी प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच तिच्या पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. नागोठणे पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या गुन्ह्याची उकल केली आहे. गौळावाडी पेण येथील कृष्णा नामदेव खांडवी हा २३ वर्षिय तरुण बेपत्ता झालेबाबतची तक्रार नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तरुणाचा कुठलाच थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे नागोठणे पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या तरुणाचा तपास सुरू केला होता. तर बेपत्ता तरुणाचा मोबाईल नंबर मिळवून त्याचा सिडीआर तपासणी सुरू केली होती. तांत्रिक विश्लेषण करून त्याच्या संपर्कात आलेले संशयित नंबर पोलीसांनी प्राप्त केले. तांत्रिक तपासानंतर पोलीसांनी एक पथक नाशिक येथे पाठवले होते.
रायगड परिसरामध्ये सदर गुन्हयाच्याअनुशंगाने सखोल तपास करण्यात आला असता मयताची पत्नी आणि उमेश सदु महाकाळ वय २१ वर्षे, रा. जि. नाशिक या दोघांचे दोन वर्षापासुन प्रेमसंबध होते, त्यांना लग्न करण्याचे होते, त्यामुळे त्यादोघांनी आणखिन एका तरुणीला हाताशी धरून कृष्णा खांडवी याची हत्या करण्याचा कट रचला. सुरवातीला पायल वारगुडे नावाचे खोटे इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. नंतर या अकाऊंटवरून कृष्णा खांडवी याच्याशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. इन्स्ट्राग्रामवर कॉल करून त्याच्याशी प्रेम संबंध जुळवण्याचे नाटक केले. त्यानंतर नागोठणे बस स्थानकावर त्याला बोलावून त्याचे अपहरण करून वासगाव येथील जंगल भागत नेऊन त्यांची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून रसायन टाकून चेहरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या खिशातील मोबाईल काढून तो पाली येथे नेऊन सिमकार्ड काढून फेकून दिला.
कुठलाही पुरवा मागे राहू नये याची खबरदारी आरोपींनी घेतली होती. मात्र पोलीसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपींना जेरबंद केले. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊन नका संशयास्पद घटनांची माहिती पोलीसांना कळवा असे आवाहन या घटनेनंतर पोलीसांनी केले आहे. या गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन अशोक कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, नरेश थळकर,पोलीस हवालदार महेश लांगी, प्रशांत भोईर, चंद्रशेखर नागावकर, मनिषा लांगी, दिपा पाटील, प्रकाश हंबीर यांनी महत्वाची भूमिका बजावली.