नांदेड : हवामान खात्याचा अंदाज सर्वदूर भागासाठी असला, तरी तो काही ठिकाणीच खरा ठरतो आहे. शनिवारी नांदेड जिल्ह्यात तसा अनुभव आला. मोजून तीन तालुके वगळता अन्य ठिकाणी एकतर अतिवृष्टी किंवा अल्पवृष्टी नोंदली गेली. ९३ पैकी केवळ ३ मंडळात ६० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला. वाहून आलेल्या पाण्याने मात्र कुठे नदी दुथडी भरली तर कुठे नाले फुटले. सखल भागात पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने गाव पाण्यात बुडाल्याचे दृश्य दिसले. प्रामुख्याने आमगव्हाण (ता. हदगाव) येथील चित्रीकरण समाजमाध्यमांवर पसरल्याने ढगफुटी झाल्याची अफवा उडाली.
सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू आहे. आणखी आठ दिवसांनी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करेल. ते नक्षत्र सुद्धा पावसाचे म्हणून ख्यातीप्राप्त आहे. वास्तविक पारंपरिक गणकानुसार पोळा झाल्यावर पाऊस सुद्धा भोळा होतो, त्यातील जोर ओसरतो, असे मानले जात असे; पण अलीकडच्या दोन दशकांत ऐन गणेशोत्सवात पावसाचा अनुशेष भरून निघतो आहे. शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत १०.२० मिमी पावसाची नोंद झाली. नांदेड आणि अर्धापूर तालुक्यात सुमारे ४० मिमी पाऊस झाला. मुदखेडमध्ये २५.४० तर लोहा येथे २०.७० मिमी पाऊस झाला. अन्य १२ तालुक्यांत दोन आकडी सुद्धा नोंद झाली नाही.
मंडळनिहाय पावसाची आकडेवारी पाहता ९३ महसुली मंडळांपैकी तब्बल ३९ मंडळात शून्य मिमी पाऊस अर्थात पाऊसच पडला नाही. केवळ नांदेड ग्रामीण (६१.५), तरोडा (६५.३) आणि दाभड (६१.५) या तीन मंडळात ६० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. कंधार, मुखेड, देगलूर, नायगाव या तालुक्यात या पावसाळ्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. अर्धा पावसाळा झालेला असताना जिल्ह्यात आज रोजी पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ८४.२८ टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४४.५९ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षी आजवर १०९.०१ टक्के पाऊस झाला होता.
विष्णुपुरीत ८४.६१ टक्के साठा
नांदेड शहराला पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात ८४.६१ टक्के साठा जमा झाला आहे. ११.८१० दशलक्ष घनमीटर आवक सुरू असून, यात सातत्य राहिल्यास रात्री उशिरा दरवाजा उघडावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली. इसापूर धरणात ८९.५४ टक्के साठा आहे. ३१२ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या माजलगाव धरणात मात्र केवळ ८१.४०० दशलक्ष घनमीटर साठा आहे. अर्थात हे धरण केवळ २६ टक्केच भरले आहे. येलदरी, सिद्धेश्वर, लोअर दुधनामध्ये चांगला साठा आहे. परंतु, लिंबोटी व बारुळमध्ये अद्याप आवक होणे गरजेचे आहे.