अलिबाग- रायगड जिल्ह्यात तीन महिन्यांत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांचा आततायीपणा आणि स्थानिक परिस्थितीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वर्षासहली जीवघेण्या ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
गेल्या तीन महिन्यांत, माथेरान, नेरळ, कर्जत, वडखळ, अलिबाग, दिघी आणि पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. माथेरानला पर्यटनासाठी आलेले दोघे कर्जत तालुक्यातील पाली भूतवली धरणात पोहण्यासाठी उतरले होते. त्यां दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. इब्राहिम आझीज खान आणि खलील अहमद शेख अशी या दोघांची नावे होती. दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील दहा जणांचा एक समूह पर्यटनासाठी माथेरान येथे आला होता. त्यातील काही जण पोहण्यासाठी शार्लोट तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. सुमित चव्हाण वय १६, आर्यन खोब्रागडे वय १९, आणि फिरोज शेख वय १९ अशी मृतांची नावे होती.
कर्जत येथील उल्हास नदीत रेडीसन हॉटेलमधील दोन कर्मचारी पोहण्यासाठी गेले होते. त्यांचा बुडून मृत्यू झाला. रुपेन सुब्बा आणि विवेक सिंह रावत अशी दोघांची नावे होती. पेण तालुक्यातील बेणसे गावात पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेलेले तीन जण बुडाले होते. त्यांना उपचारासाठी बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अश्फाक अन्सारी वय (१६), मिझान जाकीर अत्तर वय (१४) आणि जोहेब जाकीर अत्तर वय (१७) अशी तिघांची नावे होती. श्रीवर्धन तालुक्यातील खानलोशी गावात तेजस निगुडकर या ठाण्यातील तुरुणाचा बुडून मृत्यू झाला. पोलादपूर लोहेरे येथे जोगेश सुरेन ओरन हा २१ वर्षीय एल अँड टी कंपनीतील कंत्राटी कामगार नदीपात्रात वाहून गेला. कर्जत तालुक्यातील पाषाणे धरणात अजय रावत या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पावसाळी पर्यटन धोक्यात आले आहे. या घटनांची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून ठिकठिकाणच्या वर्षा पर्यटन केंद्रांवर पर्यटकांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. दरवर्षी हजारो पर्यटक वर्षासहलींसाठी रायगड जिल्ह्यात दाखल होत असतात. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, रोहा, माणगाव, सुधागड पाली, महाड आणि पोलादपूर येथील पर्यटनस्थळांचा समावेश असतो. मात्र पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमधून आणि धबधब्यांमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात.
या दुर्घटनामागील प्रमुख कारणे कोणती….
पर्यटकांचा आततायीपणा आणि निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटन आणि त्यावर आधारित व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.