छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढताच असून शुक्रवारी सायंकाळी हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धाराशिव, लातूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम होता. अनेक भागांत वादळी वाऱ्यामुळे तारा तुटल्याने विजेच्या धक्क्याने जनावरे मृत झाल्याचे वृत्त आहे. अनेक भागांत रस्त्यावर पाणी आले. मे महिन्यात अशा प्रकारचा पाऊस गेली अनेक वर्षे पाहिला नसल्याचे सांगण्यात येते. नदी, नाले तर वाहिलेच, शिवाय धरणांमध्येही आता ३५ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद महसूल यंत्रणेकडे करण्यात आली आहे. दरम्यान, नांदेडमध्ये ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक भागांतील शेतांमध्ये पाणी साचले आहे.
हिंगोलीचे वार्ताहर कळवितात, की दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला. हिंगोली- सेनगाव भागात पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. धाराशिव जिल्ह्यातही जोरदार पाऊस आहे. परांडा तालुक्यातील साकत शिवारात जनावरे चरत असताना अचानक विजेची तार तुटून दोन जनावरांच्या अंगावर पडली. त्यामुळे जनावरे ठार झाली, तर अंकुश देवकर हा शेतकरी जखमी झाला.मराठवाड्यात शुक्रवारी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. सकाळपासून वातावरण थंड होते. अनेक भागांत सूर्यदर्शन घडले नाही. नांदेड जिल्ह्यात विशेषतः केळी, आंबा, हळद, उन्हाळी ज्वारी, पपई व केळी यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
नालेसफाई न केल्याने लातूरमध्ये घरांत पाणी लातूर महापालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई न केल्यामुळे दररोजच्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचे प्रकार घडले आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नंदी स्टॉपसारख्या उंच मानल्या जाणाऱ्या भागातील घरांमध्येही पाणी शिरले. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी महाराज चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्त्यावरही फूटभर पाणी रात्री साचले होते. शहरातील क्लॉईल नगर, जयनगर, पंचशील चौक, सम्राट चौक, गंजगोलाई, महादेव नगर, साठेनगर अशा सर्वंच भागांतील गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही.
रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी कचरा साफ करण्याच्या कामात गुंतले होते. महापालिका साधारण मे महिन्यात नालेसफाईची कामे करते. मात्र, यावर्षी ही कामे झाली नाहीत. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी १९.७ मिमी पाऊस पडतो. यावर्षी मात्र केवळ तेरा दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी १६१ मिमीपाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा ८१८ टक्के जादा पाऊस पडल्याची नोंद झाली असून, आजपर्यंतच्या नोंदींच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.