मारुती चित्तमपल्ली यांची सूचना

सोलापूर : एके काळी सोलापूरचे वैभव ठरलेल्या आणि सार्वत्रिक प्रचंड उदासीनतेमुळे उत्तरोत्तर दुर्मीळ झालेल्या माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व जपण्यासाठी नान्नज अभयारण्णात माळढोक पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोडय़ा वाढविण्याची सूचना अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार चित्तमपल्ली यांना रविवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या १७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित या समारंभात

चित्तमपल्ली यांना प्रदान केलेल्या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कु लगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. या वेळी भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. तिरूवसगम यांची उपस्थिती होती.

विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रथम कु लगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्र कु लगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी स्वागत केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आदर्श राज्यकर्त्यां म्हणून संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्च केले. महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रमुख नद्यांवर घाट बांधले. विहिरींमध्ये दिवा लावण्यासाठी कोनारेही बांधले. त्यांच्या नावे असलेल्या आणि आपले जन्मगाव असलेल्या सोलापुरात विद्यापीठाने आपला जीवनगौरव पुरस्कार देऊ न सन्मानित केल्याबद्दल चित्तमपल्ली यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माळढोक पक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध झालेल्या नान्नज माळढोक अभयारण्यात आता माळढोकचे दर्शन होणे दुर्लभ झाले आहे. माळढोक पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोडय़ा असल्याशिवाय पक्ष्यांची संख्या वाढणार नाही. किमान दहा-पंधरा जोडय़ा तरी असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. तिरुवसगम म्हणाले,की स्वतंत्र भारताची एकविसाव्या शतकात वाटचाल होत असताना आधुनिक शिक्षण केवळ उद्योजक घडवून चालणार नाही, तर त्याहीपेक्षा पुढे जाऊ न उत्कृष्टता निर्माण करणे हा शिक्षणाचा प्रमुख उद्देश असला पाहिजे. या वेळी कु लगुरू डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या प्रगतीवर प्रकाशझोत टाकला. प्रा. ममता बोल्ली व प्रा. विद्या लेंडवे यांनी सूत्रसंचालन  केले.