Raj Thackeray on Alliance with Shivsena UBT Uddhav Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले होते. “महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या प्रश्नापुढे आमच्यातील वाद, भांडणं अतिशय किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर दोन पक्षांमध्ये युती होईल, तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना साद घातल्याची चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, राज ठाकरे यांनी या चर्चांवर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे आणि चुकीचे अर्थ काढले गेले”. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबई तक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी जुन्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
“हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगलं नाही”
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अशोक चव्हाण, नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांच्या एकत्र फोटोवर टिप्पणी केली. यावर त्यांना विचारण्यात आलं की महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारच्या युत्या होणं, आघाड्या होणं, दोन विरोधक एकत्र येणं हे नेहमीचंच झालं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? यावर राज ठाकरे म्हणाले, “हे चित्र चांगलं नाही. ही चांगली गोष्ट नव्हे. असं केल्याने तुम्ही मतदारांची प्रतारणा करताय असा त्याचा अर्थ होतो”.
माझं ते वक्तव्य युतीपुरतं मर्यादित नव्हतं : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, “हा केवळ आघाडी किंवा युतीचा प्रश्न नव्हे. मी त्या दिवशी एक वक्तव्य केलं आणि त्याचे खूप वेगळे अर्थ काढले गेले, चुकीचे अर्थ काढले गेले. मी तेव्हा म्हटलं की कुठलीही भांडणं, वाद बाजूला ठेवू, माझ्यासाठी त्या भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. मात्र, त्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढले गेले. माझं ते वक्तव्य युती किंवा आघाडीपुरतं मर्यादित नव्हतं. ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. दोन पक्ष एकत्र आले काय, युती झाली काय किंवा आघाडी झाली काय, यापेक्षा महाराष्ट्राचं काय होतंय ते सर्वात महत्त्वाचं आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. ते सर्वात आधी थांबलं पाहिजे”.
हिंदी भाषा शिकण्याच्या सक्तीवर राज ठाकरेंचा संताप
मनसे अध्यक्ष म्हणाले, “देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण महाराष्ट्रात आहे. सरकार आजवर यापर उपाय शोधू शकलेलं नाही. महाराष्ट्र खूप अडचणीत सापडला आहे. आम्ही रज्यातील मुलांकडून प्रगतीचा विचार करायचा की त्यांच्यावर एक अजून एक भाषा शिकण्याची सक्ती करायची? याचा विचार करायला हवा. हा केवळ युती किंवा आघाडीचा प्रश्न नाही. एखादा नेता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेला. तुम्ही त्याचा प्रचार केलात. मात्र, तोच माणूस तुरुंगातून बाहेर आल्यावर तुम्च्याबरोबर घेऊन बसला. भाजपाचा कार्यकर्ता हे चित्र पाहून काय विचार करत असेल”.