Raj Thackeray Warning to Election Commision : मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (१९ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार आहेत असा दावा केला. राज ठाकरे निवडणूक आयोगाला म्हणाले, “मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होत नाहीत तोवर महाराष्ट्रात निवडणुका घेऊ नका. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी एक वर्ष थांबू. परंतु, तुम्ही आधी मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त करा.”

दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की आम्ही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले की “सत्ताधाऱ्यांना मिरच्या का लागतात? ते उत्तर द्यायला पुढे का येतात? मुळात आम्ही जे आज बोलतोय तेच हे सत्ताधारी काही वर्षांपूर्वी बोलत होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक आयोगाला इशारे देत होते.”

राज ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की सगळं स्वच्छ होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका. मतदार याद्यांमधील दुरुस्त्यांसाठी आणखी एक वर्ष गेलं तरी चालेल. परंतु, मतदारयाद्या दुरुस्त झाल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होता कामा नयेत. सत्ताधाऱ्यांची निवडणुका घेण्याची घाई चालली आहे. कारण त्यांनी खोटे मतदार पेरून निवडणुका जिंकण्याची सगळी तयारी केली आहे. विधानसभा निवडणुका घशात घातल्या, लोकसभा निवडणूक बळकावली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील अशाच पद्धतीने जिंकण्याचा यांचा मनसुबा आहे.

३ वाजता सर्वपक्षीय पत्रकार परिषद

“सत्ताधाऱ्यांनी सगळं गणित जमवलं आहे. पुढे काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने पुढे जायचं, कुठे जायचं हे सगळं ठरवलं आहे. त्यांचे सगळे टप्पे ठरले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आज दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे. ज्यामध्ये शिवसेनेचे (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) व काँग्रेससह सर्वच पक्षांचे नेते असतील. सत्ताधारी देखील या पत्रकार परिषदेला येऊ शकतात.”

सर्वपक्षीय नेते या पत्रकार परिषदेतून काय घोषणा करतात? सरकारवर किंवा निवडणूक आयोगावर काय आरोप करतात? आरोपांशी संबंधित काही पुरावे सादर केले जाणार का? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होईल.