महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ तास दिल्लीत ताटकळत काढल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंबरोबर अमित ठाकरेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट असलं तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे दिल्लीतून मुंबईत परतले असून मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधव यांनी त्यांची भेट घेतली.

बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांना माहिती देताना नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे आणि अमित ठाकरे काल दिल्लीत गेले होते. दिल्लीत त्यांनी अमित शाहांबरोबर मीटिंग घेतली. आज ते मुंबईत पोहोचले आहेत. ते मुंबईत आल्यानंतर मी आणि अविनाश जाधव आम्ही त्यांची भेट घेतली. अमित शाहांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या २-४ दिवसांत निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा >> १४ तासांच्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरे-अमित शहांचे मनोमिलन, महायुतीत नवा गडी?

दरम्यान, किती जागांसाठी मनसेने मागणी केली आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, किती जागांची मागणी केली हे मी सांगू शकत नाही. परंतु, जी काही मागणी केली आहे, त्यावर फलदायी चर्चा झाली आहे.

बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी?

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्यापासून दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तसंच, महायुतीत समाविष्ट झाल्यानंतरही या जागेसाठी मनसे आग्रही असण्याची शक्यता आहे. यावर बाळा नांदगावकर म्हणाले, कोणाला कुठून उमेदवारी द्यायची याबाबत पक्ष निर्णय घेईल. माझ्या इच्छेनुसार इथे काही होणार नाही. जे पक्ष नेतृत्त्वाला वाटतं तेच या पक्षात होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ ला विरोध अन् आता पाठिंबा?

२०१९ मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. मात्र, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता. राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हीडिओ’ हे विधान कमालीचे चर्चेत होते. मात्र, पाच वर्षांनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून राज ठाकरे यांनीही राजकीय भूमिका बदलली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मदत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.