मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा आज मुंबईतल्या गोरेगाव ठिकाणी असलेल्या नेस्को मैदानात पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी मतदार याद्यांमधल्या घोळांवर भाष्य केलं. तसंच मुंबई गुजरातला हवी होती हे सरदार पटेलच म्हणाले होते असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. आज झालेल्या भाषणात त्यांनी मतदार याद्यांमधले घोळ मिटत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊच नका असंही म्हटलं आहे.

सरदार पटेल यांचं नाव घेत काय म्हणाले राज ठाकरे?

रस्ते होत आहेत, विकास होतोय वाटत असेल तर ते तुमच्यासाठी नाही. माझा विकासाला विरोध नाही, पण जे उद्योजक जमिनी विकत घेत आहेत त्यांच्यासाठी आहे. जिथे नजर पडेल ते पाहिजे आहे त्यांना. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमची मराठी माणसं दलाल म्हणून यांच्यासाठी कामं करत आहेत. केंद्र, राज्य आहेच यांच्या हातात. महापालिका आणि जिल्हा परिषदा आल्या तर रानच मोकळं होईल. जे काही चाललं आहे ते सहज चाललेलं नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्ही मुंबई गुजरातला हवी होती. सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आचार्य अत्रेंची पुस्तकं वाचा म्हणजे तेव्हा तुम्हाला समजेल की याला पहिला विरोध कुणी केला होता. हे सगळं आत्ताचं नाही, हे सगळं जुनंच आहे. त्यासाठीच बोगस मतदार भरले जात आहेत. सगळं काही एकदा हातात आलं की तुम्ही नंतर काय करणार? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

जमीन हातातून गेली की तुमच्या हाती काहीच उरत नाही-राज ठाकरे

जमीन एकदा हातातून गेली की ती परत येत नाही. जमीन हेच तुमचं अस्तित्त्व आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे सतर्क राहा. यादी प्रमुखांना मी बोलवलं आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की आमचे लोक येतील आणि इतर पक्षांचे लोक येतील त्यांना सहकार्य करा. एक एक घरात आठशे माणसं, सातशे माणसं भरली जात आहेत. जे मतदार नाहीत त्यांची खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहेत. हे जोपर्यंत मतदार याद्या पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सगळ्या पक्षांचं समाधान होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. महाराष्ट्रातल्या निवडणुका सन्मानाने आणि शांततेत पार पाडायच्या असतील तर याद्यांचा घोळ मिटवा. जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टीकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले.