Raj Thackeray Uttar Sabha Thane : राज ठाकरेंची ठाण्यातली सभा हा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. ‘उत्तर सभा’ असं म्हटलेल्या या सभेमध्ये राज ठाकरे त्यांच्या पाडवा सभेनंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर देणार होते. त्यामुळे त्याबद्दल मोठी उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये बोलताना पवार कुटुंबावर आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. यापैकी राज ठाकरेंच्या मुख्यत: निशाण्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. “शरद पवार हे स्वत: नास्तिक असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजवण्याचा प्रयत्न करत असतात”, असं म्हणतानाच राज ठाकरेंनी शरद पवारांवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भूमिका बदलण्यावर शरद पवारांनी बोलावं?”

मी जातीयवाद भडकवतो, हे शरद पवारांनी बोलावं का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. “शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत? मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना ढुंगणावर लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती?” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray Uttar Sabha : “कसलं हिंदुत्व? जो फक्त दंग्यांमध्ये हिंदू होतो तो…”, ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंची चौफेर टोलेबाजी!

“पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत, पण…!”

दरम्यान, राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करण्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. शरद पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

“शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, त्यामुळे…”

“महाराष्ट्रात जातीपातीचा चिखल होतोय. यांना यांचं जे राजकारण करायचं ते करू द्यात. पण बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की यातून बाहेर या. यातून आपल्या हाताला काहीही लागणार नाहीये. ही सगळी मंडळी फक्त तुमचा वापर करून घेतील. कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखालाखाचे मोर्चे निघाले. काय झालं त्याचं? यांना निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं. त्यातून मतं पदरात पाडून घ्यायची होती”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“राज्य सरकारला जे करायचंय ते करावं, आम्ही मागे हटणार नाही”, राज ठाकरे यांचा ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम

“शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

“…म्हणून शरद पवार कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत”

“शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठ्यांची माथी भडकवायची असतील… त्यांच्याच एका भाषणात अफजलखान इथे आला, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. तो हिंदू-मुस्लीम नव्हता म्हणे. मग तो आला कशासाठी होता? तो काय केसरी टूर्स, वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का?” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray thane speech uttar sabha slams sharad pawar on cast politics pmw
First published on: 12-04-2022 at 21:18 IST