Raj Thackeray On Election Commision : मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (१९ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
‘तसेच महाराष्ट्रातील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा’, असा इशाराच राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. तसेच मतदार यादीतील त्रुटी निवडणूक आयोगाने दूर करण्याचं आवाहनही राज ठाकरे यांनी दिलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या इशाऱ्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
“माझ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझी विनंती हे की सतर्क राहा. मी आज सर्व यादी प्रमुखांना बोलवलं आहे. सर्व गोष्टी टप्प्या-टप्प्याने होणार. तुम्ही घरा-घरांमध्ये जा आणि याद्या तपासा. आमचे लोक जेव्हा येतील किंवा सहकारी पक्षाचे लोक जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा नागरिकांनी सहकार्य करा. एकएका घरांमध्ये आठशे-आठशे लोक भरले जात आहेत. सातशे माणसं, आठशे माणसं, एक हजार माणसं, जे मतदार नाहीत, पण अशी सर्व खोटे मतदार भरून हे निवडणुकांना समोरं जायचं म्हणत आहेत. पण जोपर्यंत ही निवडणूक यादी स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
“महाराष्ट्रातील निवडणुका शांततेत पार पाडायच्या असतील तर पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे, त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे, त्याला मतदान करू द्या. कोण सत्तेत येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला देणंघेणं नाही. पण जे मतदान होईल ते खरं होईल. या अनुषंगाने निवडणुका झाल्या पाहिजेत.”
‘महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार’ : राज ठाकरे
“आत्ताही विधानसभेची निवडणूक झाली २३२ आमदार निवडून आले आहेत. एवढं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर आवाक झालेच होते पण निवडून आलेलेही आवाक झाले होते. कारण त्यांनाही कळलं नाही कसा निवडून आलो. मग सगळ्यांनाच समजलं की निवडणुका कशा प्रकारे चालल्या आहेत. कसे विजय मिळतात, कसं यश मिळतं ते कळलं”, असं राज ठाकरे म्हणाले.
“राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये रुपांतर होत नाहीत असं अनेक जण म्हणतात. असं केलं तर कशी काय मिळेल मतं? मला तर कळलं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी १ जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत ८ ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत तर मग प्रचार कशाला करायचा? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स झाली आहे. अशा प्रकारे निवडणुका होणार का? ही कोणती लोकशाही आहे?”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.