आज मराठी भाषा गौरव दिन. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची जयंती. त्यानिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषा गौरव दिननिमित्त पत्र लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. ‘व्यवहारात, प्रशासनात मराठी ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण, त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे,’ अशी साद राज ठाकरेंनी मराठी भाषिकांना घातली आहे.

राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?

कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण, नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती.

हेही वाचा : “राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली”, म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली. मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पक्ष पण आमचाच पहिला. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच जी राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.

असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे, हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी इथपासून ते अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण, त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी तरच हे शक्य आहे.

मला माहिती आहे, मनसेकडूनच तुमच्या सगळ्याबाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.

हेही वाचा : “भाजपा-मिंधे गटातल्या बाटग्या हिंदूंचे रक्त…”, ‘त्या’ प्रकाराचा उल्लेख करून ठाकरे गटाचा हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न वास्तवात यावं, ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.