Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांत जाऊन नेते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेत आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बैठकांचा धडाका लावला आहे. राज ठाकरे हे नुकतेच पुणे दौऱ्यावर देखील होते.

असं असतानाच आता मनसेमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या एका मोठ्या नेत्यासह तीन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून कोकणातील मनसेमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे.

दरम्यान, या संदर्भातील माहिती मनसे अधिकृत या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून देण्यात आली आहे. एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार या पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली आहे. तरी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी.”

कोणत्या पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई

मनसे अधिकृत या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोकणातील मनसेचे नेते तथा राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदलकर, संतोष नलवडे, सुबोध जाधव यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईचं कारण काय?

मनसेने या संदर्भात जारी केलेल्या एका पत्रामध्ये या कारवाईचं कारण नमूद करण्यात आलं आहे. पक्षाच्या नियमांचं आणि धोरणांचं उल्लंघन केल्यामुळे आणि पक्षविरोधी कार्य केल्याने मनसे अध्यक्ष राज टाकरे यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.